‘स्टार वॉर्स- द फोर्स अवेकन्स’ या चित्रपटाने उत्तर अमेरिकेत तिकीटबारीवरचा विक्रम मोडला असून प्रदर्शित होताच २३.८ कोटी डॉलरचा गल्ला मिळवला आहे. हा डिस्नेचा साय-फाय महाचित्रपट असून त्यात हॅरिसन फोर्ड, कॅरी फिशर व नवोदित ऑस्कर आयझ्ॉक, जॉन बोयेगा, डेझी रिडले यांचा समावेश आहे. या चित्रपटाने भरपूर पैसा मिळवताना ज्युरासिक पार्कचा २०.९ कोटी डॉलर्सचा विक्रम मोडला आहे, असे दी न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीत म्हटले आहे. अमेरिका व कॅनडात या चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठे यश मिळवले असून डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या २०१२ मधील ‘द हॉबिट -अ‍ॅन अनएक्सपेक्टेड जर्नी’ या चित्रपटाच्या दुप्पट पैसा मिळवला आहे. हॉबिटने डिसेंबरच्या प्रदर्शनात ८.४६ कोटी डॉलर्स मिळवले होते. ‘द फोर्स अवेकन्स’ चित्रपटाने जगात प्रदर्शित झाल्यानंतर ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, रशिया यासाह १४ देशात ५१.७ कोटी डॉलर्सची कमाई केली आहे. ल्युकास फिल्मचे अध्यक्ष कॅथलिन केनेडी यांनी सांगितले की, ल्युकास फिल्म्सने चमकदार कामगिरी केली आहे. जे.जे अब्राहम हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाने स्टार वॉर शैलीतील चित्रपटाचा वेगळा अनुभव सादर केला आहे. लोकांनी हा चित्रपट आपलासा केला व त्यातील अनुभव मनात जतन करून ठेवला. जगभरात या चित्रपटासाठी लोकांनी मोठी गर्दी केली याबाबत आपण प्रेक्षकांचे आभारी आहोत, असे वॉल्ट डिस्ने स्टुडिओचे अध्यक्ष अ‍ॅलन हॉर्न यांनी सांगितले.
दरम्यान, अलविन अँड द चिपमंकस – द रोड चिप हा चित्रपट उत्तर अमेरिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याला १.४४ कोटी डॉलर्स मिळाले आहेत तर टिना फे व अ‍ॅमी पोहलर यांच्या ‘सिस्टर्स’ या विनोदी चित्रपटाने १.३४ कोटी डॉलर्स कमावून तिसरा क्रमांक मिळवला आहे.