महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचा समावेश असलेले राज्य विद्यापीठ परीक्षा मंडळ स्थापणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या धर्तीवर विद्यापीठ परीक्षा मंडळ स्थापण्यात येईल. या मंडळावर आयएएस अधिकाऱ्यांमार्फत नियंत्रण ठेवण्यात येईल. विद्यापीठ परीक्षा मंडळाची घोषणा केली असली तरी त्याचा विस्तृत आराखडा मात्र तावडे यांनी सांगितला नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या विविध राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या परिषदेत तावडे सहभागी झाले होते.
या परिषदेत महाराष्ट्राने शालेय व उच्च शिक्षणात ‘चॉइस बेस्ड् क्रेडिट सिस्टम’ प्रणालीचा समावेश करण्याची मागणी केली होती. ही मागणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मान्य केल्याचे तावडे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. येत्या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता नववी ते पदव्युत्तर शिक्षणात ही प्रणाली वापरण्यात येईल. या प्रणालीमुळे शिक्षण संस्थांचे गुणात्मक मूल्यमापन व विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या विषयात कौशल्य विकसनाची संधी मिळण्याची आशा तावडे यांनी व्यक्त केली.
शिक्षण व तंत्रज्ञानाची सांगड धोरण ठरवताना घालण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून ‘शाळा दर्पण योजना’ सुरू करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, नगर व महानगरपालिका शाळांमध्ये ही योजना राबवण्यात येईल. ज्यात विद्यार्थ्यांचे विविध पातळ्यांवर मूल्यमापन करण्यात येईल. त्याचा संदेश पालकांना मोबाइलवर पाठवण्यात येईल. राज्यात शिक्षणसेवकांची साडेतीन हजार रिक्त पदे यंदा भरण्यात येणार आहेत. यंदा १८० शिक्षणसेवक अतिरिक्त ठरले होते. त्यांच्यापैकी ९० जणांना नियमित करण्यात आले आहे. उरलेल्यांना नव्या भरतीत प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती तावडे यांनी दिली. येत्या शैक्षणिक वर्षांपासून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी विभाग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही तावडे यांनी केली. येत्या २७ फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिनापूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरमध्ये आयआयएम उभारण्यास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हिरवा कंदील दिल्याची घोषणा तावडे यांनी केली.