पश्चिम बंगालमधील काँग्रेसच्या आघाडीवरून पक्षातील अंतर्गत मतभेद आणखी तीव्र झाले असून ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील स्तुतिसुमने बंद करा’, असा हल्लाबोल लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी मंगळवारी काँग्रेसमधील बंडखोर ‘जी-२३’ गटातील नेत्यांवर केला.

काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांशी युती केली असून त्यात आता मुस्लीम धर्मगुरू अब्बास सिद्दीकी यांचा इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) हा पक्षही सहभागी झाला आहे. प्रक्षोभक विधाने करून सिद्दीकी अनेकदा वादात सापडले आहेत. त्यांचा पश्चिम बंगालमधील मुस्लीम समुदायावर प्रभाव असला तरी त्यांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले गेले होते. ‘जी-२३’ गटातील नेते आनंद शर्मा यांनी हाच मुद्दा उपस्थित करून काँग्रेसच्या ‘आयएसएफ’ला सहभागी करून घेण्यावर आक्षेप घेतला. काँग्रेस सर्व प्रकारच्या धर्मांधतेविरोधात नेहमी लढत आला असल्याचे ट्वीट शर्मा यांनी केले होते. पश्चिम बंगालमध्ये आघाडी करण्यासंदर्भात कार्यकारी समितीत चर्चा करायला हवी होती, असाही मुद्दा शर्मा यांनी उपस्थित केला होता. त्यावरून काँग्रेसमध्ये गांधी निष्ठावान आणि बंडखोर नेत्यांमध्ये वाद सुरू आहे.

अधीर रंजन चौधरी यांनी मंगळवारी बंडखोर नेते हेच मोदींचे कौतुक करून धर्माध भाजपला बळ देत असल्याचा आरोप केला. राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी जम्मूमधील संमेलनात मोदींची स्तुती केली होती. त्यावर, ‘निवडक मान्यवर काँग्रेसवासींनो (जी-२३ गट) वैयक्तिक लाभाचा मोह सोडा आणि पंतप्रधानांवर स्तुतिसुमने उधळण्यात वेळ दवडू नका.. पक्षाला मजबूत करा, तुम्हाला मोठे करणाऱ्या पक्षाच्या मुळावर घाव घालू नका’’, असे ट्वीट अधीर रंजन यांनी केले आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांशी आघाडी केली आहे. ‘आयएसएफ’ला डाव्या पक्षांच्या कोटय़ातून जागांचे वाटप केले जाईल. शिवाय, पाच राज्यांमध्ये भाजपविरोधात काँग्रेसला बळकट करा. भाजपच्या धोरणांची री ओढू नका, असे आवाहन ही अधीर रंजन यांनी केले आहे.

आझाद यांच्या प्रतिमेचे दहन 

जम्मूमधील संमेलनात काँग्रेस नेतृत्वावर झालेल्या अप्रत्यक्ष टीकेवर पक्षाने अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र, जम्मूमधील काँग्रेस कार्यकर्त्यांंनी मंगळवारी आझाद आणि शर्मा यांच्या प्रतिमेचे दहन करून राहुल गांधी झिंदाबादच्या घोषणा दिल्या. ही निदर्शने गांधी निष्ठावानांकडून ‘जी-२३’ गटाला दिलेले प्रत्युत्तर मानले जात आहे. जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकांमध्ये आझाद प्रचाराला आले नाहीत, आता इथे येऊन मोदींचे कौतुक करत आहेत, अशी टीका या कार्यकर्त्यांनी केली