देशाच्या संरक्षण विभागाच्या उपहारगृहांमध्ये तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री थांबविण्यासाठीचे पत्र केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी संरक्षण मंत्री अरुण जेटली यांना लिहिले आहे.
हर्षवर्धन म्हणतात की, “देशाचे लष्करी दल शाररिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असावे असे आत्मियतेने वाटते. त्यामुळे संरक्षण विभागाच्या उपहारगृहांत आरोग्याला हानी पोहोचविणाऱया तंबाखूजन्य उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालावी आणि सैनिकांसाठीच्या सिगारेट तसेच इतर तंबाखूजन्य उत्पादने उपलब्ध करण्याबाबतच्या योजनेचा पुर्नविचार करावा.” तसेच नौदलांच्या जहाजांसह देशाचे सर्व संरक्षण विभाग ‘नो स्मोकिंग झोन’ म्हणून घोषित करण्यात यावे असेही हर्षवर्धन यांनी पत्रात म्हटले आहे.
हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीचाही या पत्रामध्ये आधार घेतला आहे. दरवर्षाला सहा दशलक्ष नागरिकांचा तंबाखूसेवनाने उद्भविलेल्या रोगाने मृत्यू होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या या भूमिकेवर देशाच्या सैनिकांनी नाराज होण्याचे कोणतेही कारण नाही उलट, यामुळे देशात जनजागृती होत असल्याचा सकारात्मक दृष्टीकोन सैनिकांनी दाखविणे गरजेचे आहे आणि संबंधित मंत्रालयदेखील या विषयाकडे नक्कीच लक्ष देऊन संरक्षण विभागांच्या उपहारगृहांमध्ये होणाऱया तंबाखूजन्य उत्पादनांच्या अनुदानित विक्रीवर पुर्नविचार करेल अशी आशा आहे. असेही हर्षवर्धन म्हणाले आहेत.