तामिळनाडूत एका सरकारी शाळेत आपल्या आवडत्या शिक्षकाची बदली झाल्याचं कळताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. शिक्षकाच्या बदलीचा विद्यार्थ्यांनी जोरदार विरोधही केला. परिस्थिती अशी होती की, विद्यार्थ्यांनी शिक्षकाला घेराव घालत कुठेही जाऊ दिलं नाही. ‘सर प्लीज आम्हाला सोडून जाऊ नका’, असं हे विद्यार्थी वारंवार बोलत होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या निषेध आंदोलानंतर अखेर शाळेलाही दखल घ्यावी लागली आणि त्यांनी १० दिवसांसाठी त्या शिक्षकाची बदली थांबवली.

चेन्नईमधील तिरुवल्लर येथील ही घटना आहे. बुधवारी वेलियाग्राम येथील सरकारी शाळेतील काही विद्यार्थ्याना इंग्रजीचे शिक्षक जी भगवान यांची दुसऱ्या शाळेत बदली झाल्याची बातमी मिळाली. थोड्याच वेळात वेगवेगळ्या वर्गातील जवळपास १०० विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घातला आणि बदलीचा विरोध करण्यास सुरुवात केली.

शाळेत दोनच इंग्रजीचे शिक्षक आहेत, ज्यामधील भगवान एक आहेत. मुख्याध्यापक अरविंदन यांनी सांगितल्यानुसार, ‘भगवान सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. बुधवारी सकाळी अजून एक शिक्षक आले होते. त्यादिवशी औपचारिकता पूर्ण झाल्याने भगवान यांनी १० वाजण्याच्या आधी नवीन शाळेत पोहचायचं होतं. पण मुलांनी त्यांना थांबवलं, ज्यामुळे ते जाऊ शकले नाहीत’.

यावेळी काही विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही उपस्थित होते. त्यांनीदेखील भगवान यांची बदली थांबवण्यात यावी अशी इच्छा यावेळी व्यक्त केली. बदली थांबवण्यासाठी पालक आणि शिक्षक संघटनेने स्थानिक आमदार नरसिम्हन यांच्याकडे मदत मागितली आहे. मुख्याध्यापक अरविंदन यांनी बदली १० दिवसांसाठी थांबवण्यात आल्याची माहिती दिली आहे.

दुसरीकडे भगवान यांचं म्हणणं आहे की, ‘मी वर्गातून बाहेर पडताच विद्यार्थ्यांनी मला घेरलं. त्यांनी माझी स्कूटरची चावी खेचून घेतली. माझी बॅगदेखील काढून घेतली. सर्वजण खूप रडत होते. नंतर त्यांनी मला ओढत वर्गात नेलं. हे पाहून मला दिसतंय की, मी फक्त पैसे कमावलेले नाहीत तर त्यांचं प्रेमही कमावलंय. मला माहित आहे की मला जायचं आहे, पण या गोष्टीने मला खूप मोठी शिकवण दिली आहे’.