कोटामधील प्रशिक्षण संस्थांकडून मदतीचा हात

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत असल्याने या शिक्षणनगरीतील ४० हून अधिक संस्था या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. सदर विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे, नैराश्याने ग्रासलेल्या विद्यार्थ्यांना धीर देणे आणि सहकार्य करणे यासाठी शिक्षण संस्थांनी अहोरात्र हेल्पलाइन सुरू करण्याचे ठरविले आहे.

प्रशिक्षित व्यावसायिकांच्या मदतीने हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय कॉम्पिटेटिव्ह एज्युकेशनल युथ सोसायटी, या ४० हून अधिक संस्थांच्या एकछत्री संघटनेने घेतला. त्यापूर्वी या प्रश्नावर अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. कोटामध्ये १.५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्यापैकी बहुसंख्य जण अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी प्रशिक्षण घेत आहेत.

२०१४ मध्ये जवळपास ४५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून २०१३ च्या तुलनेत ही ६१.३ टक्के इतकी वाढ आहे. यापैकी सर्व जण थेट कामगिरीच्या दबावाशी निगडित नाहीत. या वर्षी पोलिसांनी २४ आत्महत्या नोंदविल्या आहेत.

प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी आत्मचिंतन करून विद्यार्थ्यांबाबतचा आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे, असा विचार बैठकीत मांडण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य पसरल्याची चाहूल लागताच आपण सावध झाले पाहिजे, यासाठी हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जे विद्यार्थी समस्यांबाबत चर्चा करण्यास पुढे येत नाहीत त्यांना या हेल्पलाइनद्वारे मदत मिळेल हा उद्देश आहे, असे सोसायटीचे सचिव अमित गुप्ता यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

सर्व मोठय़ा-छोटय़ा आणि खासगी संस्थांनी अशा प्रकारची हेल्पलाइन असण्याची गरज आहे याला गुप्ता यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले. आता सुरू करण्यात येणाऱ्या हेल्पलाइनमध्येही याच प्रकारची मदत पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत आणि त्यासाठी आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून मदत लागण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.