गोव्यातील आगामी निवडणुकीत महायुतीचा मानस असल्याचे संकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांनी दिले आहेत. गोव्यामध्ये मातृभाषेतून शिक्षण द्यावे आणि इंग्रजी शाळांना मिळणारे अनुदान बंद करावे, या मताशी समविचारी पक्षांच्या पाठिंब्याने आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात काही अडचण नसल्याचे वेलिंगकरांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांना गोव्यामध्ये खंबीर पाठिंबा देण्यास शिवसेनेने यापूर्वी उत्सुकता दाखवल्याची चर्चा रंगली होती. यासंदर्भात बोलताना वेलिंगकर म्हणाले की, सध्या गोवा प्रजा पार्टी सोबत एकत्र लढण्याची बोलणी सुरु आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र गोमांतक समिती आणि शिवसेना यांच्यासोबत युती करण्याबाबत राजकीय सल्लागारांच्या सल्ल्याने निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यातील निवडणुकीमध्ये विविध पक्षांचा पाठिंबा घेण्यासाठी मराठी भाषा संवर्धन हा एकमेव मुद्दा केंद्रस्थानी असेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, शिवसेना वेलिंगकरांना राजकीय नव्हे, तर सामाजिक पार्श्वभूमीवर पाठिंबा देणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. गोव्यामधील कोकणवासियांचा दाखला देत त्यांनी मराठी संवर्धनासाठी वेलिंगकरांच्या मागणीचे समर्थन केले. शिवसेना गोव्यामध्ये 20 जागा लढविणार असल्याचे याअगोदरच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी वेलिंगकर महायुतीची मोर्चेबांधणी करत असल्याचे संकेत सध्या दिसत आहे.

यंदा गोव्यातील निवडणुकीमध्ये भाजप सत्तेत येणार नसल्याच्या वक्तव्यानंतर वेलिंगकरांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोवा प्रमुखपदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. गोव्यामध्ये मातृभाषेतून शिक्षण द्यावे आणि इंग्रजी शाळांना मिळणारे अनुदान बंद करावे, अशी वेलिंगकर यांची मागणी आहे.