बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयच्या हाती देण्यात यावा असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यासंदर्भातील आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्याचसंदर्भातील याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. या आदेशानंतर आता राजकीय नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. हा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करणारे भाजपाचे खासदास सुब्रमण्यम स्वामी यांनीही अवघ्या तीन शब्दांमध्ये या निकालावर प्रतिक्रिया दिली असून ती काही मिनिटांमध्ये व्हायरल झाल्याचे पहायला मिळत आहे.

सुशांतने १४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यापासूनच त्याच्या मृत्यूबद्दल संक्षय व्यक्त केला जात होता. सुशांतच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ माजली होती. त्यातच काही राजकीय व्यक्तींनीदेखील या प्ररकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यामध्ये स्वामी यांचाही समावेश होता. आज सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिल्यानंतर स्वामींनी तीन शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी, “सीबीआय जय हो” असं म्हटलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते आणि एम. एस. धोनी चित्रपटामध्ये सुशांतच्या वडिलांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनाही या निकालाबद्दल ट्विटवरुन आनंद व्यक्त केला आहे. “जय हो.. जय हो.. जय हो..  ” असं ट्विट खेर यांनी केलं आहे.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी करण्यात यावी यासंदर्भात मागील काही आठवड्यांपासून स्वामी यांनी अनेकदा ट्विटवरुन वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले होते. यामध्ये अगदी काही कागदपत्र शेअर करण्यापासून ते डॉक्टरांची चौकशी करण्यापर्यंतची मागणी केली होती.