देश सोडण्याआधी मी अर्थमंत्री अरुण जेटलींसमोर सेटलमेंटसाठी प्रस्ताव ठेवला होता, तसंच लंडनला जाण्यापूर्वी अरुण जेटलींना मी भेटलोही होतो, असा खळबळजनक दावा कर्जबुडव्या विजय मल्ल्या याने केल्यानंतर आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर खुद्द भाजपाचेच ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी गंभीर आरोप केला आहे. स्वामींनी ट्विटरद्वारे केलेल्या आरोपांमुळे जेटली अडचणीत येण्याची शक्यता आहे.


‘मल्ल्या फरार होण्यासंबंधी आता आपल्याकडे दोन अशे तथ्य आहेत, जे कोणीही नाकारु शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे 24 ऑक्टोबर 2015 रोजी मल्ल्याविरोधातील लूक आउट नोटीस कमकुवत करण्यात आली, जेणेकरुन 54 लगेज बॅग घेऊन मल्ल्याला देशाबाहेर पळता यावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संसदेमध्ये मल्ल्याने अर्थमंत्री जेटली यांना लंडनला रवाना होत असल्याची माहिती दिली होती. असं स्वामींनी ट्विट करुन म्हटलं आहे.

लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी मल्ल्याने देश सोडण्याआधी मी अर्थमंत्री अरुण जेटलींना भेटल्याचा गौप्यस्फोट केला. संपूर्ण प्रकरण सेटल करण्यासाठी भारत सोडण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. मी बँकांचे कर्ज भरण्यासाठी तयार होतो. मात्र बँकांनी माझ्या सेटलमेंटवर प्रश्न उपस्थित केले, असा आरोप मल्ल्याने केला आहे. दरम्यान, विजय मल्ल्याच्या या गौप्यस्फोटानंतर विरोधकांनी अर्थमंत्री अरुण जेटलींसह मोदी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तर जेटलींनी मल्ल्याचे सर्व आरोप फेटाळून लावत मल्ल्या खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे.