सामाजिक, राजकीय विषयांवरील आपल्या भूमिकांमुळे सतत चर्चेत राहणारे भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आता थेट स्वपक्षालाच अल्टीमेटम दिला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षाकडे एक प्रस्ताव दिला असून, त्यावर कारवाई करण्यासाठी उद्यापर्यंतची वेळ दिली आहे. स्वामी मागील काही दिवसांपासून भाजपाच्या आयटी सेलविरोधात आक्रमक झाले असून, त्यासंदर्भातच हा इशारा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. आपल्याला बनावट आयडीवरून ट्रोल केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर स्वामी यांनी आज पुन्हा एक ट्विट केलं आहे, ज्यात मालवीय यांच्यावरील कारवाईसाठी भाजपाला अल्टीमेटम दिला आहे.

आणखी वाचा- वचन दिलं होतं की २१ दिवसात करोना संपवण्याचं, पण…; राहुल गांधींची पुन्हा मोदींवर टीका

“भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना मालवीय यांना हटवण्यासाठी एक प्रस्ताव दिला आहे. जर उद्यापर्यंत मालवीय यांना आयटी सेलमधून हटवण्यात आलं नाही. तर त्याचा अर्थ असा होईल की, पक्ष माझा बचाव करू इच्छित नाही. पक्षात असा कोणताही मंच नाही, जिथे मी मत विचारू शकेल, त्यामुळे मला स्वतःलाच माझा बचाव करावा लागेल,” असं स्वामी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

आणखी वाचा- “भारतीय प्रसारमाध्यमे मोदींच्या पाळीव कुत्र्याप्रमाणे वागत आहेत”

स्वामी यांनी सोमवारी पहिल्यांदाच भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्यावर टीका केली होती. भाजपाचा आयटी सेल दंगाबाज झाला आहे. यातील काही सदस्य बनावट आयडीवरून माझ्यावर वैयक्तिक हल्ले करत आहेत. जर माझ्या समर्थकांनीही प्रत्युत्तरात असे हल्ले सुरू केले, तर मला जबाबदार ठरवलं जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे भाजपाच्या आयटी सेलच्या कृत्यांसाठी पक्षाला जबाबदार ठरवता येत नाही,” अशा शब्दात स्वामी यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.