पाकिस्तानमध्ये भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना गुरूद्वारामध्ये रोखण्याचं प्रकरण आता तापण्याची शक्यता आहे. याप्रकरणी भारताने तीव्र संताप व्यक्त केला असून पाकिस्तानच्या उप-उच्चायुक्तांना समन्स जारी केला आहे. शनिवारी अजय बिसारिया यांना गुरूद्वारामध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. विशेष म्हणजे गुरुद्वारामध्ये जाण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या.

पाकिस्तानच्या या कृत्याचा भारताकडून निषेध व्यक्त केला जात आहे. शनिवारी अजय बिसारिया हे आपल्या पत्नीसह रावळपिंडीनजीक हसन अब्दल येथे असलेल्या पंजा साहिब या गुरुद्वारात जात असताना त्यांना रोखण्यात आले. येथे जाण्यासाठी आवश्यक त्.या सर्व परवानग्या बिसारिया यांच्याकडे होत्या. तरीही त्यांना ऐनवेळी प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे त्यांना इस्लामाबादला परतावं लागलं होतं.

अजय बिसारिया यांना गुरद्वारामध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी एप्रिलमध्येही भारतीय भाविकांना भेटण्यासाठी जात असताना बिसारिया यांना रोखण्यात आलं होतं. त्यानंतर भारताने तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता.