News Flash

दिल्ली पोलिसांकडून काही पत्रकारांचीही चौकशी

गतवर्षी जानेवारी महिन्यात आपल्या मृत्यूपूर्वी सुनंदा पुष्कर यांनी ज्या काही पत्रकारांशी संवाद साधला होता, त्या सर्वाची चौकशी पोलिसांतर्फे करण्यात आली आहे.

| January 23, 2015 04:58 am

गतवर्षी जानेवारी महिन्यात आपल्या मृत्यूपूर्वी सुनंदा पुष्कर यांनी ज्या काही पत्रकारांशी संवाद साधला होता, त्या सर्वाची चौकशी पोलिसांतर्फे करण्यात आली आहे. तत्कालीन केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी असलेल्या सुनंदा पुष्कर अत्यंत रहस्यमय परिस्थितीत एका पंचतारांकित हॉटेलात मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्या घटनेचे धागेदोरे शोधून काढण्याचे काम दिल्ली पोलीस सध्या करीत आहेत.
आयपीएल प्रकरणावरून तसेच पुष्कर यांचे पती शशी थरूर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार हिच्याशी असलेल्या कथित संबंधांवरून पुष्कर यांची हत्या झाली असावी, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे आपल्या अखेरच्या काही क्षणांमध्ये झालेल्या संवादांदरम्यान पुष्कर यांनी दूरध्वनीवरून झालेल्या संवादांमध्ये कोणालाही याविषयी काही अधिक खुलासेवार पद्धतीने सांगितले होते का, याचा तपास दिल्ली पोलीस करीत आहेत आणि त्यासाठीच काही पत्रकारांची चौकशी करण्यात आली आहे.
मेहेर तरार यांच्याशी थरूर यांचे संबंध असावेत, असा संशय पुष्कर यांना होता तसेच वादग्रस्त आयपीएल प्रकरणात आपण थरूर यांच्यावरील आरोप आपल्यावर घेतले असल्याचे सुनंदा यांनी काही पत्रकारांना सांगितल्याचे म्हटले जात आहे. त्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी चौकशीची भूमिका घेतली आहे. त्याच दृष्टीने दोन महिला आणि एका पुरुष पत्रकाराची चौकशी करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
१७ जानेवारी रोजी सुनंदा पुष्कर या एक पत्रकार परिषद घेणार होत्या, मात्र त्याच दिवशी त्या मृतावस्थेत आढळल्या, असेही काही पत्रकारांकडून म्हटले गेले आहे. त्यामुळे सुनंदा यांच्या आयुष्यातील अंतिम टप्प्यात त्यांच्या संपर्कात असलेल्या पत्रकारांची चौकशी करण्याचा पोलिसांचा मानस आहे.
यंदा १ जानेवारी रोजी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू ही हत्या असल्याचे ठरवून या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. थरूर यांचा सहकारी नारायण याने जबानीत दिलेल्या माहितीनुसार सुनंदा यांचा खरोखरीच पत्रकार परिषद घेण्याचा काही मानस होता का, याचाही तपास विशेष तपास पथकामार्फत केला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2015 4:58 am

Web Title: sunanda pushkar case police questioning some journalists
Next Stories
1 … तर किरण बेदींचा प्रचार करेन – कुमार विश्वास
2 सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांचे निधन
3 अक्षय कुमारच्या ‘बेबी’वर पाकिस्तानमध्ये बंदी
Just Now!
X