देशामध्ये करोनाबाधितांचा आकडा दिवसोंदिवस वाढत असतानाच दुसरीकडे बिहारमध्ये अंधश्रद्धेचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील काही महिलांनी करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून चक्क करोना देवीची पूजा करण्यास सरुवात केली आहे. यासंदर्भातील वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

बिहारमधील अनेक जिल्ह्यांमधील महिला करोना देवीची पूजा करत असल्याचे वृत्तसमोर आलं आहे. नालंदा, गोपालगंज, सारन, वैशाली, मुज्जफरपूरसारख्या जिल्ह्यांमधील छोट्य़ा छोट्या गांवांमधील महिला गावातील नद्या, विहरी आणि नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांजवळ जाऊन करोना देवीचा पूजा करताना दिसत आहेत. या पुजेचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. ही पूजा करताना महिला एकमेकींपासून लांब उभ्या राहून सोशल डिस्टन्सींगचे पालन करता दिसत आहेत.

गोपाळगंज येथील फुलवारीया घाटात महिल सात खड्डे खोदून त्यामध्ये लवंगा, वेलची, फुले व सात ‘लाडू’ यांच्यासह गुळांचा पाक ठेवत आहेत. करोना या साथीच्या आजारापासून मुक्त होण्यासाठी ‘कोरोना देवी’ची पूजा करत असल्याचे या महिला सांगतात. तर मुजफ्फरपूरमधील ब्रह्मपुरा येथील सर्वेश्वरनाथ मंदिरात काही महिला धार्मिक विधी करत आहेत. एक व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला कोरोनाचा पळवून लावण्यासाठी लाडू, फुले व तिळाचा प्रसाद चढवला पाहिजे अशी आपल्याला जाणीव झाल्याचे एका महिलेने सांगितले. तर दुसऱ्या एका महिलेने स्वप्नात देवीने आपल्याला दर्शन दिल्याने पूजा करण्यासाठी आल्याचे कारण दिलं.

बक्सर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये महिला ‘कोरोना देवी’ ची पूजा करताना दिसतात. महिला गटा गटाने गंगा नदीवर स्नान करून नदीकाठच्या ठिकाणी प्रार्थना करतात. सात खड्डे तयार करुन त्यात धूप, गुळ व तिळासह लाडू आणि फुलझाडे जमिनीत पुरण्यात येतात आणि या महिला ‘करोना देवी’ची आराधाना करतात.

बर्‍याच भागांमध्ये पूजा केल्यानंतर ‘करोना देवी’ला पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. एकीकडे ग्रामीण भागातील महिलांना ‘करोना देवी’ची पूजा करण्यास सुरुवात केली असली तरी अनेकांनी ही अंधश्रद्धा असल्याचे म्हटलं आहे. मुझफ्फरपूरमधील पंडित विनय पाठक हे अशा अंधश्रद्धा पसरवण्यापेक्षा वैद्यकीय उपाचारांवर अधिक भर दिला पाहिजे असं सांगतात. तर बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठाचे समाजशास्त्राचे प्राध्यापक बी.एन. सिंह यांनी “जेव्हा जेव्हा आपल्यावर कोणताही त्रास होतो तेव्हा आपण सर्व जण देवाचा धावा करतो.अनेक प्रसंगी श्रद्धा अंधश्रद्धेचे रूप धारण करते. आपणही अशाच परिस्थितीत आहोत. कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी लोकांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला आहे,” असं मत व्यक्त केलं.

गोपाळगंजमधील सिव्हिल सर्जन डॉ. त्रिभुवन नारायण सिंह यांनीही या प्रकाराला अंधश्रद्धाच म्हटले आहे. “कोरोना हा एक साथीचा रोग आहे आणि त्यावर वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत,” असं सिंह सांगतात.