लोकांना शांततेने निदर्शने करण्याचा हक्क असून निदर्शकांना अधिकाऱ्यांनी दडपून टाकू नये, असे मत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी भारतातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले आहे.

गट्रेस यांचे प्रवक्ते स्टीफन डय़ुजारिक यांनी सांगितले, की भारताच्या संदर्भात गट्रेस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर गट्रेस यांनी म्हटले आहे की,  तुम्ही जेव्हा हा प्रश्न उपस्थित करता तेव्हा इतरांना जे आम्ही सांगत आलो तेच सांगणे क्रमप्राप्त आहे. अशा आंदोलनांमध्ये बळाचा वापर करून ती दडपून टाकणे चुकीचे आहे, कारण लोकांना शांततामय पद्धतीने आंदोलन करण्याचा हक्क आहे. अधिकाऱ्यांनी त्यांना निदर्शने व शांततामय आंदोलन करू द्यावे, त्यांच्यावर दडपशाही करू नये हेच आमचे भारतालाही सांगणे आहे.

भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी मंगळवारी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर गट्रेस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. श्रीवास्तव म्हणाले होते, की काही देशांच्या नेत्यांनी चुकीच्या माहितीवर  अनावश्यक मते व्यक्त केली आहेत.

टड्रो भूमिकेवर ठाम

ओट्टावा : शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत वक्तव्य केल्याबद्दल कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना भारताने समज दिली असतानाही त्यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. शांततापूर्ण निदर्शने करण्याचा हक्क अबाधित राहिला पाहिजे, जगात कोठेही शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली तरी त्याला आपला पाठिंबा असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

अकाली दलाचे नेते पवार-ठाकरेंना भेटणार

मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी अकाली दलाचे नेते मुंबईत येत असून रविवारी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्याची शक्यता आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.