ओदिशातील प्रसिद्ध सूर्य मंदिराबाबत वादग्रत टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अभिजीत अय्यर यांना सुप्रीम कोर्टाने गुरुवारी दिलासा देण्यास नकार दिला. कोर्टाने अय्यर यांचा जामीन अर्ज फेटाळला असून सुनावणीदरम्यान जिवाला धोका असल्याचा दावा अय्यर यांच्या वतीने करण्यात आला. यावर कोर्टाने ‘जिवाला धोका असेल तर तुरुंगच तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित जागा आहे’, असे सांगितले.

पत्रकार अभिजीत अय्यर मित्रा यांनी कोणार्कच्या सूर्य मंदिर आणि ओदिशा राज्यासंदर्भात ट्विटरवर एक आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केला होता. अय्यर यांनी या ट्विटद्वारे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. ओदिशाच्या विधानसभेत अय्यर यांच्याविरोधात प्रस्ताव देखील मांडण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी २० सप्टेंबर रोजी अय्यर यांना अटकही केली होती.

अय्यर यांच्यावतीने सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर सुप्रीम कोर्टात गुरुवारी सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने अय्यरचा जामीन अर्ज फेटाळला. सूर्य मंदिरासंदर्भातील तुमची टिप्पणी आम्ही बघितली. तुम्ही धार्मिक भावना दुखावल्या असून तुम्हाला जामीन कसा काय देता येईल?, असा सवाल कोर्टाने विचारला. यावर अय्यर यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, या वादानंतर अय्यर यांच्या जिवाला धोका आहे. यावरही सुप्रीम कोर्टाने मत नोंदवले. जिवाला धोका असेल तर तुरुंगच तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित जागा आहे, असे कोर्टाने अय्यर यांना सांगितले.