नवी दिल्ली: बंदी घातलेल्या ‘सारिडॉन’सह आणखी तीन ‘फिक्स्ड डोज काँबिनेशन्स’ना (एफडीसी) सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी विक्रीची परवानगी दिल्यामुळे, हे लोकप्रिय वेदनाशामक आता देशभरातील औषधांच्या दुकानांमध्ये उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काही औषधनिर्माते आणि औषधविक्रेत्यांच्या संघटना यांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने केंद्राला नोटीस जारी करून त्यांना उत्तर सादर करण्यास सांगितले. पिरामल हेल्थकेअरचे ’सारिडॉन’, ग्लॅक्सो स्मिथक्लाईनचे ‘पिरिटॉन’ आणि जुगाट फार्माचे ’डार्ट’ यांच्यासह आणखी एका औषधाच्या विक्रीला न्यायालयाने परवानगी दिली आहे. चौथ्या औषधाची माहिती मिळू शकली नाही. तथापि, आरोग्य मंत्रालयाने ७ सप्टेंबरच्या अधिसूचनेद्वारे बंदी घातलेल्या ३२८ एफडीसी औषधांच्या यादीत असलेल्या इतर औषधांच्या बाबतीत कुठलाही दिलासा दिला नाही. एफडीसी म्हणजे दोन किंवा अधिक औषधे एका ठरावीक प्रमाणात एका सिंगल डोजच्या स्वरूपात असलेले औषध होय.

आरोग्य मंत्रालयाने १० मार्च २०१६च्या एका अधिसूचनेद्वारे, एफडीसींचे उत्पादन, विक्री आणि वितरण यांना बंदी घातली होती. याला फार्मा कंपन्यांनी आधी दिल्ली उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.