दिल्लीत हवाप्रदूषण कमालीचे वाढले असून वाहतूक पोलिसांच्या डय़ुटय़ा या आलटूनपालटून वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात याव्यात अशी मागणी करणारी वाहतूक पोलिसांच्या आरोग्याबाबत एका डॉक्टरने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा व न्या.ए.एम.खानविलकर तसेच न्या. धनंजय चंद्रचूड यांनी संजय कुलश्रेष्ठ या डॉक्टरने वाहतूक पोलिसांच्या आरोग्य काळजीपोटी दाखल केलेली याचिका फेटाळताना सांगितले की, ही कुठल्या प्रकारची याचिका आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या डय़ुटय़ा कशा लावल्या जातात यावरही लक्ष ठेवणे अपेक्षित आहे का..याचिकेत अशीही मागणी करण्यात आली आहे की, वाहतूक पोलिसांची वारंवार वैद्यकीय तपासणी करण्यात यावी कारण त्यांना हवाप्रदूषणामुळे अनेक रोग होत आहेत. वाहतूक पोलिसांना आरोग्यविषयक चांगल्या सुविधा देण्यात याव्यात, सध्या राज्य सरकारांकडून त्या दिल्या जात नाहीत असे न्यायालयाला सांगण्यात आले. याचिकादाराने न्यायालयात येण्याअगोदर सरकार वाहतूक पोलिसांना याबाबत कुठले भत्ते किंवा सुविधा देते याची माहिती अधिकारात चौकशी केली असता त्यांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत असे सांगण्यात आले होते. हवाप्रदूषण हा गेल्या पाच सहा वर्षांत गंभीर प्रश्न बनला असून पोलिसांना प्रदूषणाशी निगडित आजार जडले आहेत असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

याचिकादार बालरोगतज्ज्ञ असून हवाप्रदूषणाचा पोलिसांच्या पुनरुत्पादन क्षमतेवरही परिणाम होतो असा दावा करण्यात आला आहे. पोलिसांच्या पत्नींची मुले बालपणीच दगावतात किंवा त्यांचा गर्भपात होतो त्यामुळे त्यांची मुले जिवंत जन्माला येण्याचे प्रमाण कमी आहे असेही याचिकादाराचे म्हणणे आहे.