सहारा-सेबी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना ७ सप्टेंबरपर्यंत १५०० कोटी रूपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अॅम्बी व्हॅलीचा लिलाव सुरू करण्याचे आदेशही दिले आहेत.

पहिल्यांदा कायदेशीररित्या पैसे जमा झाल्यानंतरच या प्रकरणी गुंतवणूकदारांना पैसे मिळाले होते की नाही हे आम्ही पाहू, असे सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी म्हटले आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदार खरोखर होते की बनावट गुंवणूकदार दाखवण्यात आले होते याची तपासणीही आम्ही करणार आहोत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ सप्टेंबरला होईल असेही न्यायालयाने सांगितले.

यावेळी सुब्रतो रॉय यांनी सर्वौच्च न्यायालयाकडे ९ हजार ०१७ कोटी रूपयांची रक्कम भरण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी मागितला होता. याबाबतची याचिकाही न्यायालयाने आज फेटाळून लावली. सहारा-सेबी प्रकरणी गेल्या सुनावणीत न्यायालयाने इशारा दिला होता की, यातील ५५२.२१ कोटी रूपयांची रक्कम ही १५ जुलैपर्यंत मिळायला हवी. त्यासाठी दिलेल्या चेकचा अवधी पुढे वाढवण्याची रॉय यांची याचिका न्यायालयाने त्यावेळी फेटाळून लावली होती. १५ जूनपूर्वी १५०० कोटी रूपये भरले जातील. त्यानंतर ५५२.२२ कोटी रूपयांचा भरना बरोबर एक महिन्याने करण्यात येईल, असे रॉय यांनी न्यायालयात सांगितले होते. मात्र, १५ जुलैपर्य़ंत त्यांनी केवळ ७९०.१८ कोटींचा भरणा केला. न्या. दिपक मिश्रांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुब्रतो रॉय यांना ७०९.८२ कोटी रूपयांच्या भरण्यासाठी ४ जुलैपर्यंतची वेळ दिली होती.