परदेशात होणाऱ्या दूरध्वनींवर नजर ठेवण्याच्या ओबामा प्रशासनाच्या वादग्रस्त धोरणाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समर्थन केले आहे. अशा प्रयत्नांमुळे दहशतवादी हल्ले रोखता येतात किंवा त्यांचा छडा लावता येतो, असा दावा गुप्तचर संस्थेचे संचालक जेम्स क्लॅपर यांनी केला आहे. प्रशासनाच्या या धोरणामुळेच २६-११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी असलेला डेव्हिड हेडलीसारखा दहशतवादी पकडता आल्याचे क्लॅपर यांनी सांगितले.
लाखो अमेरिकेन नागरिकांचे फोन टॅप करणे किंवा परदेशी नागरिकांचे ई-मेल तपासणे या प्रशासनाच्या धोरणामुळे वादंग सुरू आहे. त्याबाबत क्लॅपर यांना विचारले असता त्यांनी प्रशासनाचे समर्थन केले. या धोरणांमुळे संभाव्य दहशतवादी हल्ले टाळता आले याची त्यांनी उदाहरणे दिली. २००९ मध्ये न्यूयॉर्क शहरात बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न आम्ही उधळून लावला. पाकिस्तानमधून अमेरिकेतील कोलोराडो येथे दूरध्वनी केल्यावर स्फोटाच्या षड्यंत्राचा छडा लावणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादाचा धोका पाहता देशाच्या सुरक्षिततेसाठी हे धोरण आवश्यक आहे, त्यामुळे कुणाच्या व्यक्तिगत जीवनात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रिझ्म हा माहिती चोरण्याचा कार्यक्रम २००७ मध्ये एनएसए व एफबीआय यांच्या सहकार्याने अमलात आला. अमेरिकेतून परदेशात जाणाऱ्या व परदेशातून अमेरिकेत येणाऱ्या संदेशांची काय देवाणघेवाण होते यावर पाळत हाच त्याचा प्रमुख हेतू होता.