सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत असणाऱ्या रिया चक्रवर्तीची लायकी काढल्यामुळे टीका होऊ लागल्यानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सुशांत सिंह प्रकरणी रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुप्तेश्वर पांडे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना सुशांत सिंह प्रकरणात आरोपी असणाऱ्या व्यक्तीला बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा हक्क नाही असं मला म्हणायचं होतं असं सांगितलं आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नितीश कुमार यांच्यासंबंधी बोलण्याची रिया चक्रवर्तीची लायकी नाही असं म्हटलं होतं. पत्रकारांनी त्यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी आपल्या त्याचा पुनरुच्चार केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला.

“….रिया चक्रवर्तीची लायकी नाही,” बिहारचे पोलीस महासंचालक मीडियासमोरच संतापले

“लायकीचा अर्थ इंग्लिशमध्ये नैतिक पातळी नाही असा होतो. नितीश कुमार यांच्यासंबंधी वक्तव्य करण्याची रिया चक्रवर्तीची पातळी नाही. सुशांत सिंह प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात आरोपी म्हणून आपलं नाव आहे हे रियाने विसरु नये,” असं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं आहे.

“जर एखाद्या राजकीय नेत्याने बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर भाष्य केलं तर त्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. पण जर आरोपी बिहारच्या मुख्यमंत्र्यांसंबंधी निराधार वक्तव्य करत असेल तर हे आक्षेपार्ह आहे. तिने कायदेशीर लढाई लढावी,” असं गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितलं आहे.

नेमकं काय झालं होतं?
सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आनंद व्यक्त केला. हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र यावेळी त्यांनी रिया चक्रवर्तीसंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलातना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाष्य करण्याची तिची लायकी नाही असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर पत्रकारांनी पुन्हा प्रश्न केला असता त्यांनी परत एकदा रिया चक्रवर्तीची लायकी नाही असा उल्लेख केला.