सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन रोज वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्र आयोजित केली जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. रिपलब्लिक भारतने रविवारी रात्री आयोजित केलेल्या अशाच एका चर्चा सत्रामध्ये शिवसेनेचे नेते भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्यावर चांगलेच संतापले. संतापाच्या भरात शिवसेनेच्या या नेत्याने केंद्र सरकारवर गांजा विक्री करत असल्याचा आरोपही केला.

या चर्चासत्रामध्ये संबिम पात्रांसोबत शिवसेनेचे नेते किशोर तिवारी सहभागी झाले होते. “तुम्ही आरोपांवर आरोप करत आहात. चित्रपटसृष्टीमधून अंमली पदार्थांची प्रकरण समोर येऊन याबद्दल कारवाई करुन यासंदर्भातील स्वच्छता करायला हवी हे मला मान्य आहे. मात्र तुम्ही ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करत आहात यावर आमचा आक्षेप आहे,” असं तिवारी यांनी म्हटलं. यावर पात्रा यांनी, “आम्ही कधी चिखलफेक केली? आम्ही तर केवळ पेंग्विन म्हटलं. आम्हाला कसं ठाऊक असणार की ठाकरे कुटुंबामध्ये पेंग्विन आहे?,” असं म्हणत शिवसेनेचा कधीही थेट उल्लेख केला नसल्याचे मत मांडले.

पात्रा यांनी दिलेल्या या विचित्र स्पष्टीकरणावर तिवारी चांगलेच संतापले. “आता मी इथे बोलू का, सांगू का. तुमची केंद्र सरकार, तुमचे पोलीस उघडपणे गांजा विक्री करत आहेत. इथे येऊन तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करता. दिल्लीची साफसफाई करा आधी,” असं तिवारी पात्रा यांना उत्तर देतना म्हणाले. दिल्ली पोलिसांनी गांजा पकडला आणि तुमच्या दिल्ली सरकारने तो विकला. त्यानंतरही तुम्ही इथे येऊन अंमली पदार्थांच्या विषयावर बोलत आहात. तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका, असंही तिवारी पुढे म्हणाले.

या प्रकरणामध्ये अंमली पदार्थविरोधी पक्षकाबरोबरच केंद्रीय गुन्हेअन्वेषण शाखाही (सीबीआय) तपास करत आहे. सीबीआयला या प्रकरणामध्ये हत्येचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे आता सुशांतला आत्महत्या करण्यासाठी कोणी दबाव आणला होता का याचा तपास सीबीआयकडून केला जाणार आहे. या प्रकरणामध्ये सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि तर दुसरीकडे सुशांतच्या कुटुंबानेही पोलिसांकडे तक्रार नोंदवलीय. त्यामुळेच रियाबरोबरच सुशांतच्या कुटुंबाचीही सीबीआयकडून चौकशी केली जाणार असल्याचे समजते.