“सुषमा स्वराज या माझ्यासाठी कोणत्याही जाती किंवा धर्मापेक्षा श्रेष्ठ होत्या. त्यांच्याबद्दलच्या प्रेमाला कुठलीही सीमा नव्हती. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे,” अशी प्रतिक्रिया भाजपाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांना तीन वर्षांपूर्वी किडनी दान करण्याची तयारी दाखवणाऱ्या तरुणाने दिली आहे. मुजीब अन्सारी असे या तरुणाने नाव असून स्वराज यांच्या निधनानंतर त्याने ट्विटवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. बऱ्याच काळापासून स्वराज या मूत्रपिंडाच्या (किडनी) विकाराने त्रस्त होत्या. अखेर १० डिसेंबर २०१६ रोजी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. स्वराज यांना किडनी देणाऱ्या व्यक्तीचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. मात्र या शस्त्रक्रियेसाठी ‘एम्स’मध्ये दाखल झाल्याची माहिती स्वराज यांनी ट्विटवरु दिली होती.

त्याच्या या ट्विटवर रिप्लाय करुन अनेकांनी त्यांना किडनी दान करण्याची तयारी दर्शवली होती. त्यापैकी एक असणाऱ्या उत्तर प्रदेशमधील मुजीब अन्सारी यानेही ट्विट करुन तुम्ही माझ्या आईप्रमाणे असून मी तुमच्यासाठी किडनी दान करु इच्छितो असे ट्विट केले होते.

यावर स्वराज यांनी मुजीबला उत्तर देताना किडनीला कोणताच धर्म नसतो अशी प्रतिक्रिया देत त्याचे आभार मानले होते. आज स्वराज यांच्या निधनानंतर मुजीबने ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘तीन वर्षांपूर्वी मी त्यांना माझी किडनी देण्याची तयारी दर्शवली होती. यावरुन अनेक मुस्लीमांनी माझी थट्टा केली होती. पण माझ्यासारख्या लोकांसाठी सुषमा स्वराज या कोणत्याही जाती किंवा धर्मापेक्षा श्रेष्ठ होत्या. त्यांच्याबद्दलच्या प्रेमाला कुठलीही सीमा नव्हती. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे,’ असे ट्विट मुजीबने केले आहे.

दरम्यान, स्वराज यांच्या निधनामुळे भारताने एक चांगला नेता आणि लोकांमध्ये लोकप्रिय असणारे नेतृत्व गमावल्याची भावना नेटकऱ्यांनी ट्विटवरुन व्यक्त केली आहे. राजकारण, समाजकारण, क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी ट्विटवरुन स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.