अमेरिकेत वॉशिंग्टनमधील उपनगरांमध्ये गोळीबाराच्या घटनांमध्ये दोन ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत. यावर संघराज्य कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला आहे. अंतर्गत सुरक्षा खात्याच्या संघराज्य सुरक्षा सेवेच्या बासष्ट वर्षीय एयुलालिओ टोरडिल या अधिकाऱ्यास शोधण्यासाठी मदत हवी आहे, असे पोलिसांच्या वार्तापत्रात म्हटले आहे.
मेरीलँड येथील प्रिन्स जार्ज परगण्यातील शाळेत जाऊन टोरिडिल याने त्याच्या पत्नीला ठार केले. त्याआधी शेजारच्या माँटगोमेरी परगण्यात गोळीबाराच्या दोन घटना घडल्या होत्या. आज सकाळी बेथेसडा येथे वेटसफील्ड मॉल येथे गोळीबारात एक ठार तर दोन जण जखमी झाले.
अ‍ॅस्पेन हिल या मेरालँडमधील भागात सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात एक महिला ठार झाली. यात अतिशय सखोल चौकशी केली जाईल, असे माँटगोमेरी परगण्याचे पोलिस प्रमुख पॉल स्टार्कस यांनी सांगितले.
ते म्हणाले की, बेथेसडा व अ‍ॅस्पेन हिल येथील गोळीबाराच्या घटनांचा परस्पर संबंध तपासला जात आहे. स्टार्क यांनी सांगितले की, प्रिन्स जॉर्ज परगण्यातील गोळीबार व नंतरचे गोळीबार एकाच संशयिताने केले किंवा काय याचाही तपास केला जात आहे. दरम्यान या घटनेनंतर शाळांच्या विद्यार्थ्यांना परिसरातच सुरक्षित ठेवण्यात आले. २००२ मध्ये बेल्टवे स्नायपर हल्ल्यात हेच भाग लक्ष्य करण्यात आले होते व त्या वेळी आरोपी पकडला जाण्यापूर्वी त्याने सतरा जणांचे खून केले होते.