उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका लग्नसमारंभातून परतताना एका एसयूव्ही गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. गाडी चालवत असताना चालकाचा ताबा सुटला आणि गाडी कालव्यात पडली. या गाडीमध्ये एकूण 29 जण प्रवास करत होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. गुरूवारी पहाटे 3 च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, प्रवास करणाऱ्यांपैकी सात मुलं अद्यापही बेपत्ता असून त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेत 22 जणांचे प्राण वाचवले. परंतु त्यांच्यासोबत असलेल्या 7 मुलांची कोणतीही माहिती मिळाली नाही. सचिन (6), सनी (5), साजन (8), अमन (9), सौरभ (8), मानसी (4) आणि मनिषा (4) अशी बेपत्ता असलेल्या मुलांची नावे आहेत. या घटनेनंतर एनडीआरएफच्या टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या गाडीत प्रवास करणारे बाराबंकीतील सराय पांडे गावातील रहिवासी आहेत.

कालव्यात असलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. सध्या 22 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. परंतु 7 मुले अद्यापही बेपत्ता आहेत. एनडीआरएफ आणि स्थानिकांच्या माध्यमातून बचावकार्य सुरू असल्याची माहिची लखनौचे पोलीस महानिरिक्षक एस.के.भगत यांनी दिली.