सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. झारखंडमधील पाकूर भागात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री रघुबरदास यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पाकूर येथे एका हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अग्निवेश येथे आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते हॉटेलमधून बाहेर पडतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. बीफ खाण्याच्या समर्थनार्थ स्वामी अग्निवेश यांनी नुकतेच एक विधान केले होते त्यावरुन चिडलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. हल्लेखोरांनी अग्निवेश यांना बेदम मारहाण केली तसेच त्यांचे कपडेही फाडले. त्याचबरोबर त्यांनी यावेळी काळे झेंडेही दाखवले.

स्वामी अग्निवेश म्हणाले, माझ्यावर हल्ला झाला त्यावेळी तेथे एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. मी पोलिस अधीक्षक आणि जिल्हादंडाधिकाऱ्यांना फोन केला तरी त्यांनी कारवाई केली नाही. मी त्यांना सांगितले की, अभाविप आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना तेथे निषेध करायचा होता. निषेधाची गरज नसून माझ्याकडे येऊन ते यावर चर्चा करु शकतात असे मी त्यांना सांगितले होते मात्र, कोणीही माझ्याकडे आले नाही.

उलट, जेव्हा मी हॉटेलमधून बाहेर पडलो तेव्हा अचानक माझ्यावर हल्ला झाला आणि मला शिवीगाळ करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आणि माध्यमांकडे उपलब्ध असलेल्या व्हिडीओमधून मारेकऱ्यांची ओळख पोलिसांनी पटवावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही अग्निवेश यांनी केली आहे.


दरम्यान, अग्निवेश यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा आमच्याशी संबंध नाही असे भाजपा प्रवक्ते पी. शाहदेव यांनी म्हटले आहे.