केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे वैवाहिक बलात्कारासंदर्भातले एक ट्विट वादग्रस्त ठरले असून ते नेटिझन्सनी ट्रोल केले आहे. खरेतर स्वराज कौशल हे त्यांच्या खुमासदार आणि मार्मिक ट्विटसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र ‘वैवाहिक बलात्कार (Marital Rape) जर गुन्हा ठरला तर घरांपेक्षा जास्त नवरे तुरुंगात दिसतील’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. यासाठी त्यांनी वैवाहिक बलात्कार प्रकरणी केंद्र सरकारने न्यायालयाला लिहीलेल्या एका उत्तराच्या प्रतिची लिंक रिट्विट केली आहे आणि त्यावर ही कमेंट करून आपला मुद्दा मांडला आहे. त्यामुळे त्यांच्या या ट्विटवर टीका होते आहे.

सुप्रीम कोर्टाचे वकील आणि मिझोरमचे माजी गव्हर्नर स्वराज कौशल यांचे हे ट्विट ट्रोल व्हायला सुरूवात झाली आहे. अनेक नेटिझन्सनी या ट्विटचे स्क्रीन शॉट काढून त्यांच्यावर टीका करायला सुरूवात केली. काही वेळासाठी स्वराज कौशल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या प्रायव्हसी सेटिंग्ज बदलल्या. मात्र तोवर अनेक नेटिझन्सनी या ट्विटचा स्क्रीन शॉट काढून ते रिट्विट केले होते.

 

 

लोकांची टीका व्हायला लागल्यानंतर स्वराज यांनी आणखी एक ट्विट केले. ‘तुमच्यावर जसे संस्कार झाले आहेत त्या दर्जाची टीका माझ्यावर करू शकता’ असे ट्विट स्वराज यांनी केले. तसेच माझे ट्विटर अकाऊंट हे आधीपासून प्रोटेक्टेड होते. रिट्विट रिक्वेस्टमध्ये मी ते ओपन करत असे मात्र आता ते सगळ्यांसाठी खुले आहे असेही ट्विट स्वराज यांनी केले आहे.

सुषमा स्वराज यांच्या आणि माझ्या नात्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही असेही स्वराज यांनी आपल्या एका ट्विटमध्ये दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. इतके सगळे स्पष्टीकरण देऊन लोकांनी टीका करणे सोडले नाही. त्यावेळी त्यांनी पुन्हा एक ट्विट केले. ‘ज्या कोणाला मला शिव्या द्यायच्या आहेत त्यांनी स्क्रीन शॉटचा वापर करावा मी माझे अकाऊंट लॉक करतो आहे.’ संवाद शिष्टाचार पाळला जावा यासाठी मला हे पाऊल उचलावे लागते आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.