स्वीडनमधील स्टॉकहोम येथे एअर इंडियाच्या विमानाने इमारतीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असून या घटनेत विमानाच्या पंखाचे नुकसान झाले आहे.

दिल्लीवरुन स्टॉकहोमला गेलेल्या विमानात १७९ प्रवासी होते. आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झाल्यानंतर टर्मिनल ५ पासून ५० मीटर अंतरावर असलेल्या इमारतीला विमानाने धडक दिली. विमानाच्या डाव्या पंखाचे यात नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवाशांना सुखरुप विमानातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली. या घटनेमुळे विमानतळावरील वाहतूकीवर परिणाम झाला नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही दुर्घटना कशी घडली याची चौकशी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्याची ही गेल्या दोन महिन्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी १२ ऑक्टोबर रोजी तिरुचिपल्ली येथे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाची चाके ही उड्डाणानंतर भिंतीला धडकली. १३६ प्रवासी असलेले हे विमान शुक्रवारी सकाळी दुबईसाठी उडाले असता त्याची चाके भिंतीला लागली. सुदैवाने यावेळीही मोठा अपघात टळला.