सीरियातील दक्षिण भागात आयसिसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २२० जण ठार झाले. सरकारी कार्यालये आणि बाजारपेठेला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले असून या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे.

दक्षिण सीरियातील सुवैदा या भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी सुवैदा आणि लगतच्या गावांमध्ये ठिकठिकाणी आत्मघाती स्फोट घडवले. यातील एका ठिकाणी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हे दोघेही हल्ला करण्याच्या तयारीत असताना सुरक्षा दलांनी त्यांना कंठस्नान घातले.

‘दहशतवाद्यांनी गावात घुसून सामूहिक हत्याच केल्या. त्यांनी घरात घुसून निष्पाप लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला, असे स्थानिक पत्रकारांनी सांगितले. मृतांमधील २२० पैकी १२७ जण हे नागरिक आहेत. सुवैदा भागातील हा आजवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.

हल्ल्यानंतर स्थानिक रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू असून रुग्णालयात आता जागाच उरलेली नाही, असे स्थानिकांनी माध्यमांनी म्हटले आहे. लोक स्वतःच्या कार मधून जखमींना रुग्णालयात आणत असून अनेक जण हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या नातेवाईकांच्या शोधत हॉस्पिटल गाठत आहेत.