सीरियातील रासायनिक अस्त्रे २०१४ च्या मध्यावधीर्पयच नष्ट करण्याबाबत अमेरिका व रशिया यांच्यात समझोता झाला आहे. असे असले तरी राजनैतिक प्रयत्न फसले तर सीरियावर लष्करी कारवाईचा पर्याय आमच्यापुढे खुला आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले.
जीनिव्हा येथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी व रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेइ लावारोव यांच्यात तीन दिवसांच्या वाटाघाटीनंतर अमेरिका व रशिया यांच्यात समझोता झाला. केरी यांनी सहा मुद्दय़ांवर आधारित एक व्यवस्था मांडली त्यानुसार सीरियाला एका आठवडय़ात रासायनिक अस्त्रांच्या साठय़ाची यादी जाहीर करावी लागेल तसेच रासायनिक अस्त्रांच्या ठिकाणी जाण्याची परवानगी द्यावी लागेल. नोव्हेंबरमध्ये निरीक्षक तेथे जातील व रासायनिक अस्त्रे किती आहेत याचा तपास करतील. २०१४ च्या मध्यावधीपर्यंत ही अस्त्रे सीरियाने नष्ट करावीत असे अपेक्षित असल्याचे केरी यांनी लावारोव यांच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर पत्रकारपरिषदेत सांगितले.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी बशर अल असद यांना चर्चेचा वापर वेळकाढूपणा करण्यासाठी करू नये असा इशारा दिला आहे. जर राजनैतिक प्रयत्न फसले तर सीरियावर हल्ला करण्याचा पर्याय अजूनही खुला आहे, आंतरराष्ट्रीय समुदायाने त्यासाठी सज्ज रहावे असे ते म्हणाले. रशियाने सीरियाचा रासायनिक शस्त्रसाठा नष्ट करण्याच्या संदर्भात मध्यस्थी केल्याने ओबामा यांनी लष्करी कारवाई लांबणीवर टाकली आहे.