अभ्यासात अनेक दुष्परिणाम उघड

नवी दिल्ली : काही आरोग्य कर्मचारी सध्या स्वत:हूनच हायड्रॉक्सी क्लोरोक्विनच्या गोळ्या घेत असून त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळे पोटात दुखणे, हायपोग्लायसिमिया (रक्कातील साखर खूपच कमी होणे)  यांसारखी लक्षणे दिसतात, असे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या अभ्यासात म्हटले आहे.

एपिडिमियॉलॉजी अँड कम्युनिकेबल डिसिजेस या विभागाचे प्रमुख रमण गंगाखेडकर यांनी सांगितले, की भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा अभ्यास सध्या उपलब्ध असलेल्या माहितीवरून केला आहे. त्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी या गोळ्या घेतलेल्या असल्याने त्यांनी दिलेल्या माहितीचा उपयोग करण्यात आला आहे. या आरोग्य कर्मचाऱ्यांचे सरासरी वय ३५ आहे, त्यांच्यात जे वाईट परिणाम दिसले, त्यात पोटात दुखण्याच्या तक्रारी १० टक्के लोकांनी केल्या. मळमळीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी सहा टक्के कर्मचाऱ्यांनी केल्या. १.३ टक्के लोकांमध्ये हायपोग्लायसिमिया दिसून आला. २२ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी हायड्रॉक्सी क्लोरोक्विनच्या गोळ्या या त्यांना इतर काही रोग असताना घेतल्या आहेत. त्यात श्वसनाच्या आजारांचाही समावेश आहे. त्यांनी करोना होण्याच्या भीतीपोटी या गोळ्यांचे सेवन सुरू केले. यातील १४ टक्के कर्मचाऱ्यांनी हे औषध सुरू करण्यापूर्वी त्यांचा ईसीजी तपासला नाही. अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राने केलेल्या अभ्यासानुसार प्रतिबंधात्मक व उपचारात्मक अशा दोन बाजू पाहिल्या तर वेगळ्याच गोष्टी दिसून येतात. त्यामुळे जरी आरोग्य कर्मचारी या गोळ्या घेत असले, तरी त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्या घेऊ नयेत. हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा कोविड १९ मध्ये प्रतिबंधात्मक परिणाम काय होतो याचा अभ्यास सुरू केला असून त्यासाठी ४८० रुग्णांची माहिती आठ आठवडय़ांत घेतली आहे. हायड्रॉक्सी क्लोरोक्विनचा वापर हा अझिथ्रोमायसीन बरोबर केला तरच गंभीर कोविड १९ रुग्णांना त्याचा लाभ होतो, असे सांगितले जाते. त्यामुळे भारतीय  वैद्यक संशोधन परिषदेने या औषधाचा वापर प्रतिबंधात्मक म्हणून करण्यास मान्यता दिली होती.

‘रेमेडेसीवीर’च्या उत्पादनाची गरज

रेमेडेसीवीर या विषाणूरोधक औषधाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, त्या औषधाचा वापर इबोला साथीतही केला होता. त्यातून सार्स सीओव्ही२ म्हणजे कोविड १९ विषाणूला रोखले जाऊ शकते. रेमडेसीवीर बाबत जे संशोधन झाले त्यावरून ६८ टक्के किंवा तीन पैकी २ रुग्णांना या औषधामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली नाही. दोनतीन आठवडय़ात या औषधाचे चांगले परिणाम दिसू शकतात. गिलीड सायन्सेस या उत्पादकांनी म्हटले आहे की, या औषधाचे फायदे दिसून आले आहेत. पण त्यांनी केलेला अभ्यास अजून उपलब्ध झालेला नाही. गिलीड कंपनीचे रेमडेसीवीर आपल्या देशात सध्या उपलब्ध नाही त्यामुळे स्थानिक कंपन्यांनी त्याचे उत्पादन करण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.