काश्मीरच्या पुलवमा जिल्ह्यात भारतीय लष्कराबरोबर झालेल्या चकमकीदरम्यान ठार झालेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी एक उच्चशिक्षित तरूण असल्याची बाब समोर आली आहे. तालिब अफजल शहा हा २४ वर्षीय तरूण गुरूवारी संध्याकाळी भारतीय लष्कराबरोबरच्या चकमकीत मारला गेला होता. मात्र, लष्कराच्या सततच्या त्रासाला कंटाळूनच तो दहशतवादाकडे वळाल्याचा दावा आता त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. तालिब हा एक हुशार विद्यार्थी होता आणि त्याला भविष्यात क्रीडा प्रशिक्षक व्हायचे होते. सुरक्षा दलांकडून त्याला अनेकदा दगडफेकीच्या आरोपाखाली तुरूंगात डांबण्यात आले होते. तिथे त्याच्या खूप छळ होत असे. त्यामुळेच तो दहशतवादाच्या मार्गाकडे वळाल्याचे तालिबच्या कुटुंबियांनी सांगितले. तालिब हा दक्षिण काश्मीरमधील अस्तान मोहल्ला या भागात राहत होता. त्याने २०११ मध्ये चेन्नई येथून शारीरिक शिक्षणात आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय खुल्या विद्यापीठातून इतिहास विषयात मास्टर्सची पदवी मिळवली होती. त्यानंतर त्याला क्रीडा प्रशिक्षक म्हणून कारकीर्द घडवायची होती. मात्र, २०१३मध्ये तालिबला एका खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर रहायचे असल्यामुळे त्याला एक परीक्षा देता आली नव्हती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने घर सोडले आणि तो दहशतवादी गटात सामील झाला. पोलीस आणि लष्कराच्या त्रासामुळेच त्याने दहशतवादी होण्याचा मार्ग निवडल्याचे तालिबच्या भावाने सांगितले. मात्र, पोलीसांनी तालिब हा सुरूवातीपासूनच दगडफेकीच्या अनेक कृत्यांमध्ये सामील असून लष्कर-ए-तोयबाचा भाग झाल्यानंतर तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, तालिबच्या मृत्युची माहिती समजल्यानंतर अस्तान मोहल्ला या भागात जवळपासच्या गावातील अनेकांनी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळासाठी याठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.