अफगाणिस्तानमध्ये २० वर्षांनंतर पुन्हा तालिबानचे राज्य आले आहे. लवकरच तालिबानचे सरकार सत्ता स्थापन करेल येईल. अफगाणिस्तानातली परिस्थिती सध्या जगभरासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. तालिबान्यांनी देश ताब्यात घेतल्यानंतर आता अफगाणिस्तानचं भविष्य काय? असा प्रश्न जगापुढे आहे. अशातच तालिबानी दररोज वेगवेगळे आदेश देत आहेत, फतवे काढत आहेत. त्यावरुन या प्रश्नाची गंभीरता अधोरेखित होत आहे. आताही तालिबान्यांनी एक नवी घोषणा दिली आहे. तालिबान्यांनी नोकरी करणाऱ्या महिलांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तालिबानचे म्हणणे आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव महिलांनी घरीच राहावे.

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले की, जोपर्यंत महिलांच्या सुरक्षेसाठी योग्य व्यवस्था केली जात नाही, तोपर्यंत त्यांनी घरीच राहावे. ही ‘तात्पुरती’ प्रक्रिया असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मंगळवारी काबूलमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले, “सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिला कामावर कशा येतील, यावर तालिबान काम करत आहे, पण तोपर्यंत महिलांना सुरक्षिततेच्या कारणास्तव घरी राहावे लागेल.”

तालिबानकडून वारंवार सांगितले जात आहे की या वेळी त्यांच्या राजवटीत महिलांना काम करण्यापासून रोखले जाणार नाही किंवा मुलींना शिक्षण घेण्यापासून रोखले जाणार नाही. शरियत कायद्यांतर्गत महिलांना स्वातंत्र्य मिळेल, असे तालिबानचे म्हणणे आहे. पण असे असूनही तेथील महिलांमध्ये भीती आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार (UNHRC) ची प्रमुख मिशेल बॅचेलेट म्हणाली, तालिबान्यांनी महिला आणि मुलींशी केलेली वागणूक ही धोक्याची घंटा आहे.

अफगाणिस्तानवर ताबा तर मिळवला पण पैशांचा जुगाड कसा करणार? जाणून घ्या तालिबान्यांच्या कमाईबद्दल

१९९६ ते २००१ पर्यंत तालिबानचे राज्य असताना महिलांना काम करण्याची परवानगी नव्हती. एवढेच नाही तर जर एखाद्या स्त्रीला घर सोडायचे असेल तर तिला तिचा चेहरा आणि शरीर झाकून ठेवावे लागत होते. ती फक्त पुरुष नातेवाईकासोबत बाहेर जाऊ शकत होती.

यावेळी तालिबानचे म्हणणे आहे की, महिलांनाही काम करण्याची परवानगी मिळेल. पण तालिबान ज्या प्रकारे आपल्या विरोधकांना शोधण्यासाठी घरोघरी शोध मोहीम राबवत आहेत. सुरक्षा अधिकाऱ्यांचा बदला घेत आहे आणि महिलांना नोकरीवरुन काढत आहेत. त्यामुळे लोक घाबरले आहेत. तालिबानचे म्हणणे आहे की ते या कथित वर्तनाची चौकशी करत आहेत.