अफगाण तालिबानचा म्होरक्या मुल्ला ओमर हा मरण पावल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आल्यानंतर आता त्याचा वारस म्हणून अफगाण तालिबान गटाने मुल्ला अख्तर मन्सूर याची नवा म्होरक्या म्हणून निवड केली आहे. मुल्ला अख्तर मन्सूर याची तालिबानने एकमताने निवड केल्याचे पाकिस्तानच्या माध्यमांनी म्हटले आहे.
त्याचप्रमाणे हक्कानीचा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी ऊर्फ खलिफा याची तालिबान म्होरक्याचा प्रमुख साथीदार म्हणून निवड करण्यात आली आहे, असे तालिबानच्या नेत्याने ‘दी एक्स्प्रेस ट्रिब्यून’ला सांगितले.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीत मन्सूर हा नागरी उड्डाणमंत्री म्हणून काम पाहात होता, असे अफगाणिस्तानातील एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मुल्ला ओमरचा वारसदार म्हणून मन्सूरच शर्यतीत होता, मात्र ओमर याच्या मृत्यूची बातमी त्यानेच पसरविल्याचा आरोप ठेवून त्याच्यावर तालिबानमध्येच टीका केली जात होती.
अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेन याला मदत केल्याबद्दल अमेरिका मुल्ला ओमरच्या शोधात होती. मात्र मुल्ला ओमर हा दोन वर्षांपूर्वीच ठार झाल्याच्या वृत्ताला अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. कराचीच्या एका हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारादरम्यान एप्रिल २०१३ मध्ये मुल्ला ओमर मरण पावला आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर त्याचा दफनविधी करण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा महासंचालनालयाचे प्रवक्ते अब्दुल हासीब सिद्दिकी यांनी, ओमर मरण पावल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या प्रवक्त्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला.
दरम्यान, तालिबानने अद्याप आपला नवा म्होरक्या आणि त्याचा प्रमुख साथीदार यांच्या नावांची अधिकृत घोषणा केलेली नाही. ओमर याचा विश्वासू मुल्ला बारदार अखुंद याची वारसदार म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र एप्रिल २०१३ मध्ये ओमर मरण पावल्यापासून मन्सूर हाच संघटनेची सर्व सूत्रे चालवीत होता. अफगाणिस्तान सरकारबरोबर शांतता चर्चेतही मन्सूरच सहभागी होत होता. क्वेट्टामध्ये मन्सूर शुरा कौन्सिलचा प्रमुख होता. त्याला संघटनेचा ९० टक्के पाठिंबा आहे.