केल्याचा तालिबानचा दावा
तालिबानी दहशतवाद्यांनी एका व्यक्तीला फाशी देण्यात आल्याची व्हिडीओ फीत जारी करून ती व्यक्ती गुप्तचर यंत्रणेचा अधिकारी असल्याचा दावा केला असला तरी पाकिस्तानच्या लष्कराने हा दावा फेटाळला आहे.
दहशतवाद्यांनी ज्या व्यक्तीला फासावर लटकविले ती व्यक्ती सैनिक अथवा गुप्तचर यंत्रणेचा अधिकारी नाही, असे लष्कराचे प्रवक्ते आसिम बाजवा यांनी स्पष्ट केले आहे.
रविवारी जारी करण्यात आलेल्या फुटेजमध्ये दहशतवादी एका व्यक्तीला फासावर लटकवीत असल्याचे दिसत आहे. आपण पाकिस्तान लष्कराचे प्रतिनिधी आहोत आणि हेरगिरी करीत होतो, असा दावा त्या व्यक्तीने केल्याचे सांगण्यात येत आहे.
फासावर लटकविण्यात आलेली व्यक्ती अफगाणिस्तानची नागरिक असून त्याच्या कुटुंबीयांकडून खंडणीची मागणी करण्यात आली होती. मात्र त्या मागणीची पूर्तता करण्यात आली नसल्याने त्याला फासावर लटकविण्यात आले, असे लष्कराने म्हटले आहे.
पाकिस्तानात फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली असून त्याचा बदला घेण्यासाठी या व्यक्तीला फाशी देण्यात आल्याचे दहशतवाद्यांनी व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.