तालिबान अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अनेक फतवे काढत आहे. महिलांसंदर्भात तालिबानची भूमिका नेहमी संशयास्पद राहिली आहे. तालिबाने यापुर्वी अनेक महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काबूलमध्ये पाकिस्तान विरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांवर तालिबानने हवेत गोळीबार केल्याची घटना देखील घडली होती. यापुर्वी तालिबानने अफगाण महिलांना क्रिकेट सहित अन्य खेळांमध्ये भाग घेण्यावर बंदी घातली आहे. दरम्यान, पुन्हा एकदा तालिबाने महिलांसंदर्भात धक्कादायक निर्णय घेतला आहे.

तालिबान प्रवक्त्याने मुलाखतीदरम्यान सांगितले की, महिला मंत्री होऊ शकत नाहीत, त्यांनी फक्त मुलांना जन्म द्यावा. तालिबानचे प्रवक्ते सय्यद जकारुल्लाह हाशिमी यांनी नवीन अफगाणिस्तान सरकारमध्ये महिलांचा समावेश न करण्याबाबत टोलो न्यूजवर वक्तव्य केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

तालिबान राजवाटीत अफगाणिस्तानमध्ये महिलांना प्रवासास, घराबाहेर पडण्यास बंदी आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी लेखल्या जाते. तेथे महिलांवर होणाऱ्या अत्याचाबाबत जागतिक महिला आयोगाने देखील चिंता व्यक्त केली आहे. महिलांचे स्वतंत्र नष्ट करणारा आणखी एक निर्णय तालिबानने घेतला आहे.

हेही वाचा –  Video : “हिजाब न घातलेल्या स्त्रिया कापलेल्या कलिंगडासारख्या”, तालिबान्यांनी केली तुलना, नेटिझन्स संतापले!

एक महिला मंत्री होऊ शकत नाही 

सय्यद जकारुल्लाह हाशिमी म्हणाला, “एक महिला मंत्री होऊ शकत नाही , हे असे होईल की तुम्ही त्यांच्या गळ्यात काहीतरी टाकले जे त्या घेऊ शकत नाहीत. महिलांचे मंत्रिमंडळात असणे आवश्यक नाही. त्यांनी मुलांना जन्म द्यावा. तसेच अफगाणिस्तानातील महिला आंदोलक देशातील सर्व महिलांचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत.”

महिलांवर वेश्याव्यवसायाचा आरोप

महिला समाजाचा अर्धा भाग आहे, या प्रश्नावर हाशिम म्हणाला, “पण आम्ही त्यांना (आमच्यातील) अर्धा भाग मानत नाही. अर्धा काय प्रकार असतो? अर्ध्याची व्याख्याचं येथे चुकीची आहे. अर्ध्याचा अर्थ तुम्ही त्यांना मंत्रिमंडळात ठेवता एवढाच होता. (निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नसतो,) तसेच जर तुम्ही त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन केले तर, काही विशेष फरक पडत नाही. गेल्या २० वर्षांमध्ये अमेरिका आणि अफगाणिस्तानमधील सरकारबरोबरच येथील माध्यमांनी जे काही म्हटले आहे, त्याला कार्यालयांमध्ये वेश्याव्यवसायाशिवाय इतर कसली उपमा देता येईल?”

हेही वाचा – …म्हणून महिलांना खेळांमध्ये भाग घेता येणार नाही; तालिबानचं स्पष्टीकरण

हाशिमच्या उत्तरावर आक्षेप घेत मुलाखतकाराने तुम्ही महिलांवर वेश्याव्यवसायाचा आरोप करू शकत नाही, असे म्हटले यावर हाशिम म्हणाला, “मला सर्व अफगाणी महिलांवर आरोप करायचा नाही. अफगाणिस्तानमध्ये चार महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, त्या अफगाणिस्तानच्या महिलांचे प्रतिनिधित्व करु शकत नाहीत. अफगाणिस्तानच्या महिला त्या आहेत ज्या मुलांना जन्न देतात. त्यांना इस्लामिक नैतिकतेबद्दल शिक्षण देतात.”