जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर तालिबानने एक स्टेटमेंट जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी कलम ३७० हटवण्याबद्दल खेद व्यक्त केला असला तरी भारत आणि पाकिस्तानला हिंसाचार होईल अशी पावले उचलण्यापासून दूर राहण्याची विनंती केली आहे. तालिबानने जारी केलेल्या या स्टेटमेंटमुळे दिल्लीत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तालिबानकडून जारी करण्यात आलेले हे स्टेटमेंट काही आंतरराष्ट्रीय अभ्यासकांकडून तपासून घेतल्यानंतर ते खरे असल्याचे भारत सरकारमधील सूत्रांनी सांगितले.

काश्मीर प्रश्नावर तालिबानने घेतलेली भूमिका अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे. कारण तालिबान पाकिस्तानचा खंदा समर्थक समजला जातो. तालिबानला पाकिस्ताननेच तयार केले आहे. खरंतर काश्मीर प्रश्नावर तालिबानची भूमिका पाकिस्तानसाठी एक प्रकारचा झटकाच आहे. या स्टेटमेंटमधून तालिबानने काश्मीरचा विषय अफगाणिस्तानशी जोडण्यास विरोध केला आहे. मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तान अफगाणिस्तानला काश्मीर मुद्द्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे.

अफगाणिस्तानात अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता करार घडवून आणण्याच्या मोबदल्यात पाकिस्तानला काश्मीर प्रश्नी अमेरिकेचा हस्तक्षेप हवा आहे. तालिबानने पाकिस्तानशी सुसंगत भूमिका न घेणे थोडे विचित्र असल्याचे काहीजणांचे मत आहे. तालिबानला सुद्धा अमेरिकेबरोबर करार करण्याची इच्छा असून काश्मीर विषयामुळे ही प्रक्रिया अधिक जटील होऊ शकते असे वाटल्यामुळेच त्यांनी हे स्टेटमेंट जारी केले असण्याची शक्यता आहे.

आम्हाला युद्धाचा खूप वाईट अनुभव आहे. त्यामुळे शांतता बाळगा आणि प्रादेशिक मुद्दे सोडवण्यासाठी विवेकी मार्गाचा वापर करा. काश्मीरमधील असुरक्षितता संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशांनी, ओआयसी, इस्लामिक देश आणि संयुक्त राष्ट्राने रचनात्मक तसेच विधायक भूमिका बजावावी असे तालिबानने ऑनलाइन प्रसिद्ध केलेल्या आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.