अफगाणिस्तानात रक्तरंजित युद्ध लढणाऱ्या तालिबानने आता भारत-अफगाण मैत्रीचे प्रतीक असलेल्या सलमा धरणावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. भारताने सलमा धरणावर कोट्यवधी रुपये खर्च केले होते आणि हा अफगाणिस्तानातील भारतातील सर्वात महागडा प्रकल्प आहे. हे धरण केवळ वीज निर्माण करत नाही, तर तिथल्या लोकांना सिंचनासाठी पाणी पुरवते. आता तालिबान्यांनी हे धरण उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे आणि त्याच्यावर सतत बॉम्बचा पाऊस पाडला जात आहे.

अफगाण सैन्याने हेरातमध्ये भारताने बांधलेल्या सलमा धरणावरील तालिबानचा हल्ला हाणून पाडला आहे असे अफगाणिस्तान सरकारने म्हटले आहे. या हल्ल्यात अनेक तालिबानी दहशतवादी ठार झाले असून तालिबान्यांना खूप नुकसान सहन करावे लागले असल्याचे सरकारने म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या लष्कराने प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी तेथून पळून गेले आहेत.

अफगाणिस्तान संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अमान यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “तालिबानी दहशतवाद्यांनी ३ ऑगस्टच्या रात्री भारत-अफगाणिस्तान फ्रेंडशिप डॅम म्हणून प्रसिद्ध असलेल्या सलमा धरणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हल्ला अयशस्वी झाला. चांगली गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानच्या लष्कराने प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी पळून गेले आहेत. या हल्ल्यात तालिबानचे खूप नुकसान झाले आहे.”

गेल्या महिन्यातही सलमा धरणाला केलं होतं लक्ष्य

जुलैमध्येही तालिबानने सलमा धरण उडवण्याचा प्रयत्न केला होता. तालिबानने सलमा धरणाला रॉकेटने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. पण रॉकेट धरणाजवळ पडले होते आणि धरणाचे कोणतेही नुकसान झाले नाही.

जाणून घ्या सलमा धरणाबद्दल

हेरातच्या चेशते शरीफ जिल्ह्यातील सलमा धरण हे अफगाणिस्तानातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे. या धरणातून परिसरातील हजारो कुटुंबांना सिंचनाचे पाणी आणि वीज मिळते. सलमा धरणाची पाणी साठवण क्षमता ६४० दशलक्ष घनमीटर आहे. अफगाणिस्तानमध्ये भारतातर्फे उभारण्यात आलेल्या सर्वात महागड्या प्रकल्पांपैकी सलमा धरण हा एक आहे.