बंगालच्या उपसागरातील वादळी वातावरणाचा शोधकार्यात अडथळा

भारतीय हवाई दलाचे बेपत्ता असलेले ए-३२ विमान शोधून काढण्याची अवघड मोहीम रविवारी तिसऱ्या दिवशीही सुरू होती. बंगालच्या उपसागरावरून जाताना नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटलेल्या या विमानाबाबतचा एखादा दुवा मिळावा यासाठी या भागाचे उपग्रहामार्फत छायाचित्रण करण्याची मागणी मदत व बचावकार्यात गुंतलेल्या चमूने केली आहे.

२९ लोकांना घेऊन जाणाऱ्या या विमानाचा अद्याप काहीही मागमूस लागलेला नसल्याचे संरक्षण खात्याच्या एका वरिष्ठ  अधिकाऱ्याने सांगितले.

एका पाणबुडीसह नौदल व तटरक्षक दलाची किमान १८ जहाजे, तसेच पी-८१, सी-१३० आणि डॉर्निअर यांसारखी विमाने चोवीस तास शोधकार्यात लागली आहेत. चेन्नईजवळील तांबरम हवाई तळावरून २२ जुलैला सकाळी साडेआठ वाजता पोर्ट ब्लेअरसाठी उडालेले हे मालवाहू विमान काही वेळातच बेपत्ता झाले होते. वादळी वातावरणाचे शोधमोहिमेसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे या संपूर्ण भागाचे उपग्रह छायाचित्रण मिळावे असे अधिकाऱ्यांचे प्रयत्न आहेत. उपग्रहामार्फतची संपूर्ण माहिती आम्ही मागवली आहे, असे ईस्टर्न नेव्हल कमांडचे प्रमुख, व्हाइस अ‍ॅडमिरल एचसीएस बिश्ट यांनी विशाखापट्टणममध्ये सांगितले.

या भागात समुद्राची खोली सुमारे साडेतीन हजार मीटर असून काही ठिकाणी तर ती याहून जास्त आहे. जसजशी खोली वाढत जाते, तसतशी शोधमोहिमेतील आव्हानेही वाढत जातात. वाईट वातावरण आणि सततचा पाऊस यांची यात भर पडली आहे, असे बिश्ट म्हणाले.

दरम्यान, वायूदलाच्या अधिकाऱ्यांनी एएन-३२ विमानाच्या बेपत्ता होण्याच्या घटनेबाबत तामिळनाडू पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.