तामिळ कॉमेडी अभिनेते पांडू यांचे करोनामुळे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पांडू यांची काही दिवसांपूर्वी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सकाळी, आज ६ मे रोजी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

पांडू आणि त्यांची पत्नी कुमुधा यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी पांडू यांचे निधन झाले. त्यांची पत्नी आयसीयू वॉर्डमध्ये आहे. पांडू यांच्या निधनाची माहिती अभिनेते मनोबाला यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

‘पांडू यांचे निधन झाले आहे. आज सकाळी करोनामुळे त्यांचे निधन झाले’ असे मनोबाला यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

1970 साली पांडू यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेते कमल हासन, रजनीकांत यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. ‘वाली’, ‘जोडी’, ‘जेम्स पांडू’, ‘बद्री’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.