‘नीट’ परीक्षेवरुन केंद्र व राज्य सरकारवर टीका करणारे टी.टी.व्ही दिनकरन यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकरन यांच्या समर्थकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात पत्रकांचे वाटप केले होते.

तामिळनाडूतील ‘अण्णाद्रमुक’चे बंडखोर नेते आणि शशिकला यांचे पुतणे दिनकरन यांनी ‘नीट’ परीक्षेवरुन केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली होती. केआरएस सरवानन यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून दिनकरन यांच्यासह ३६ जणांविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली. मोदी आणि पलानीस्वामी यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पलानीस्वामी यांच्या मतदारसंघातच पत्रकांचे वाटप करण्यात आल्याने दिनकरन यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे समजते. मात्र या पत्रकांमध्ये नेमके काय म्हटले होते हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी दिनकर आणि अन्य ३६ जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

‘नीट’वरुन तामिळनाडूमध्ये वाद निर्माण झाला होता. सुप्रीम कोर्टाने ‘नीट’च्या अंमलबजावणीचा आदेश देऊन ४ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थांचे समुपदेशन करण्याचे आदेश तामिळनाडू सरकारला दिले होते. सुरुवातीला केंद्राने तामिळनाडू सरकारची या वर्षी ‘नीट’मधून विद्यार्थांना सूट देण्याची भुमिका मान्य केली होती. मात्र, त्यानंतर हा कायद्याचा अनादर असल्याचे सांगत केंद्र सरकारने माघार घेतली होती.

दिनकरन यांच्याविरोधातील गुन्ह्याला पलानीस्वामी आणि दिनकरन वादाची किनारही आहे. दिनकरन आणि मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. अण्णाद्रमुकमधील दिनकरन समर्थक १८ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले होते. दिनकरन यांनी पलानीस्वामींना आव्हान दिले असून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे दोन्ही गटांचे प्रयत्न सुरु आहेत.