श्रीलंकन नौदलाने भारतीय मच्छीमारांवर हल्ला केला आहे. खोल समुद्रात मासेमारी करत असताना, श्रीलंकेच्या नौसैनिकांनी आपल्यावर हल्ला केला, असा आरोप तामिळनाडूतल्या रामेश्वरममधील मच्छीमारांनी केला आहे. या हल्ल्यामध्ये एक मच्छीमार गंभीररित्या जखमी झाला आहे. सोमवारी तामिळनाडूतील ६०० मच्छीमार धनुषकोडी आणि कच्चाथीवु बेटादरम्यान मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी हल्ल्याची घटना घडली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

श्रीलंकेच्या नौसैनिकांनी दगड आणि बाटल्या फेकून मारल्या, असा आरोप मच्छीमारांनी केला आहे. या हल्ल्यादरम्यान सुरेश (४२) नावाच्या मच्छीमाराच्या डोक्याला मार लागला आहे. रामेश्वरममधील मच्छीमारांनी या घटनेचा निषेध केला आहे. मागच्या आठवडयात भारतीय समुद्र हद्दीत मासेमारी करणाऱ्या सहा श्रीलंकन मच्छीमारांना तटरक्षक दलाने ताब्यात घेतले होते.

तटरक्षक दलाने त्यांची बोट जप्त केली व त्या सर्वांना चौकशीसाठी तामिळनाडूतील नागापट्टीनममधील कारायकल बंदरात आणण्यात आले होते. यापूर्वी सुद्धा श्रीलंकन नौदलाने तामिळनाडूतील भारतीय मच्छीमारांना ताब्यात घेतले आहे.