तामिळ टेलिव्हिजन अभिनेत्री प्रियांकाने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. चेन्नईमधल्या राहत्या घरी तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. घरगुती वादातून प्रियांकाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तीन वर्षांपूर्वी प्रियांकाचं लग्न अरुणबालाशी झालं होतं. पतीशी सतत वाद होत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून ती वेगळी राहत होती. मूल होत नसल्याने या दोघांमध्ये नेहमी भांडणं होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे याच मानसिक तणावाखाली तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

प्रियाकांच्या घरी काम करणारी मोलकरीण तिच्या घरी नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कामासाठी आली. तेव्हा तिला प्रियांकाचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला. तिने तातडीनं पोलिसांना याबाबत कळवलं. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

तामिळ भाषेतील काही मालिकांमध्ये प्रियांकाने भूमिका साकारल्या होत्या. ‘वंशम’ या मालिकेमुळे तिला अधिक प्रसिद्ध मिळाली.