भारतीय लष्कराने म्यानमारच्या हद्दीत प्रवेश करून नॅशनॅलिस्ट सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन) (खापलांग) या दहशतवादी संघटनेच्या तळावर शुक्रवारी हल्ला केला. या वेळी दहशतवादी आणि भारतीय लष्कराच्या जवानांमध्ये अनेक तास चकमक सुरू होती. भारतातील चेन मोहो गावातून आंतरराष्ट्रीय सीमा पार करून लष्कराच्या पॅरा १२ या युनिटने पिलर १५१ या परिसरात असलेल्या दहशतवादी तळावर ही कारवाई केल्याचे सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सगितले. गेल्या वर्षीही जून महिन्यात भारतीय लष्कराने म्यानमारच्या हद्दीत प्रवेश करून ईशान्येकडील सुमारे १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. म्यानमार लष्कराच्या मदतीने केलेल्या या कारवाईत दहशतवाद्यांचे दोन तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले होते. एनएससीएनच्या (खा) दहशतवाद्यांनी मणिपूरमध्ये घुसून भारताच्या १५ जवानांची हत्या केल्याचा वचपा काढण्यासाठी भारतीय लष्कराने ही कारवाई केली होती.

म्यानमार हद्दीत भारतीय लष्कर दहशतवाद्यांच्या तळाजवळ आल्याची माहिती लागल्यामुळे दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. सकाळी सहापर्यंत दोन्ही बाजूने गोळीबार सुरू होता. या गोळीबारात भारतीय लष्कराचे पाच ते सहा जवान मारल्याचा दावा एनएससीएनने केला आहे. परंतु भारतीय लष्कराने त्यांचा दावा फेटाळला आहे.

एनएससीएन (खा) या दहशतवादी संघटनेवर दबाव राहण्यासाठी करण्यात येणाऱ्या ऑपरेशनचा हा भाग असल्याचे गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अशाप्रकारचे ऑपरेशन्स या पुढेही सुरू राहणार असल्याची पुष्ठीही त्यांनी या वेळी जोडली. भारतीय लष्कराने मात्र म्यानमारमध्ये केलेल्या कारवाईच्या वृत्तास शुक्रवारी नकार दिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय सैन्य म्यानमारच्या हद्दीत घुसून अशी कारवाई करते. परंतु ही बाब सार्वजनिक केली जात नसल्याचे एका सूत्राने सांगितले.

म्यानमारला भारतातील ईशान्येकडील दहशतवादी समस्येबाबत काळजी असली तरी त्यांना सार्वजनिकरित्या भारतीय लष्कराला अशा कारवाईस समर्थन देता येत नाही. तरीही म्यानमारचे लष्कर भारताला नेहमी सहकार्य करते. गेल्या वर्षी केलेल्या संयुक्त लष्करी कारवाईचे वृत्त सार्वजनिक झाल्यानंतर त्यांना अडचणीचा सामना करावा लागला होता. ईशान्येकडील दहशतवाद्यांनी यापूर्वीही भारतीय लष्करावर भीषण संहारक हल्ले केले होते.