करचोरीच्या आरोपांखाली दैनिक भास्कर आणि भारत समाचार या दोन प्रमुख माध्यमसमूहांच्या विविध शहरांतील कार्यालयांवर प्राप्तिकर खात्याने गुरुवारी छापे घातल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

दैनिक भास्कर समूहावरील छापे भोपाळ, जयपूर, अहमदाबाद, नॉयडा व देशातील इतर काही ठिकाणी घालण्यात येत आहेत. उत्तरप्रदेशातील भारत समाचार ही वृत्तवाहिनी, तसेच तिचे प्रवर्तक आणि कर्मचारी यांच्या निवासस्थाने व कार्यालये येथे लखनौत छापे घालण्यात आले, असेही सूत्रांनी सांगितले.

या छाप्यांबबत प्राप्तिकर खाते किंवा त्याचे धोरण ठरवणारी संस्था असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अधिकृतरित्या काहीही सांगितले नाही.

भाजपचे उत्तरप्रदेशच्या बस्ती जिल्ह्यांतील हरैया मतदारसंघातील आमदार अजय सिंह व त्यांच्या सहकाऱ्यांकडेही प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे घातले. मात्र हे छापे माध्यम समूहांवरील छाप्यांशी संबंधित होते काय, हे लगेचच कळू शकले नाही.

दैनिक भास्कर समूहाविरुद्धच्या कारवाईत मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे असलेल्या त्याच्या प्रवर्तकांच्या निवासस्थांवरील छाप्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दल आणि मध्यप्रदेश पोलीस यांच्या कर्मचाऱ्यांनी कर विभागाच्या अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवली होती.

या दोन माध्यम समूहांनी देशातील करोना व्यवस्थापनावर टीका केली होती व एप्रिल- मेमध्ये देशात करोनाची दुसरी लाट शिखरावर असताना अधिकाऱ्यांचे अपयश आणि लोकांना झालेला त्रास याबद्दलच्या अनेक बातम्या प्रकाशित केल्या होत्या.

हस्तक्षेप नाही – ठाकूर

यंत्रणा त्यांचे काम करत असून त्यात कुणाचाही हस्तक्षेप नाही, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्राप्तिकर खात्याने गुरुवारी दोन माध्यमसमूहांवर घातलेल्या छाप्यांच्या संदर्भात सांगितले. लोकशाहीचा आवाज दडपण्यासाठी हे छापे घालण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ठाकूर यांनी हे उत्तर दिले. ‘आरोप करण्यापूर्वी  संपूर्ण माहिती घ्यावी… कधी कधी सत्यापासून फार दूर असणारे अनेक मुद्दे लक्षात येतात’, असे ठाकूर म्हणाले.