मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी प्रंतपधान मोदी यांची ग्वाही

देशातून २०२५ पर्यंत क्षयरोग पूर्णपणे नष्ट करण्याच्या ‘क्षयरोगमुक्त भारत’ मोहिमेची मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली. क्षयरोगाचा पूर्णपणे नायनाट करण्याचे जागतिक पातळीवरील प्रयत्न यशस्वी झाले नाहीत असे सांगून मोदी यांनी क्षयरोगमुक्त भारत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भूमिकेत बदल करण्याची गरज असल्याचे सांगितले.

क्षयरोगाच्या प्रत्येक रुग्णावर सुरुवातीलाच सर्वोत्तम उपचार करण्याचे आपल्या सरकारचे तत्त्व आहे आणि त्यासाठी खासगी क्षेत्राची मदत घेण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. गाव, पंचायत, जिल्हा आणि राज्य क्षयरोगमुक्त करण्यासाठी विविध घटकांनी प्रत्येक स्तरावर सहभाग द्यावा आणि त्यासाठी कार्यकर्ते आणि अन्य संबंधितांनी योगदान द्यावे, असे मोदी म्हणाले. क्षयरोगाबाबत आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत ते बोलत होते.

क्षयरोगाचा जीवन, अर्थव्यवस्था आणि देशाच्या भवितव्यावर परिणाम होतो, गरीब वर्ग या रोगाने बाधित आहे त्यामुळे क्षयरोग नष्ट करण्यासाठी उचलण्यात आलेले प्रत्येक पाऊल हे गरिबांच्या जीवनाशी थेट निगडित आहे, असेही ते म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेने २५ वर्षांपूर्वी क्षयरोगाबाबत भाष्य केले होते आणि तेव्हापासून अनेक देशांनी या रोगाचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र अद्यापही रोगाचा पूर्ण नायनाट झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे आपल्याला भूमिकेत बदल करून आतापर्यंत झालेल्या कामाचे विश्लेषण करावे लागेल आणि त्यामुळे नवे मार्ग शोधण्यास मदत होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

क्षयरोग हद्दपार करण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वपूर्ण

जगभरातील क्षयरोगाविरुद्धची लढाई संपवयाची असेल तर प्रथम भारतातून क्षयरोगाला हद्दपार करणे आवश्यक आहे. भारतामध्ये क्षयरुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यामुळे मोठय़ा प्रमाणात बळींची संख्या वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अढॅनॉम घेब्रेयेसूस यांनी म्हटले आहे. ते दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘२०२५ मध्ये क्षयरोग हद्दपार’ करण्यासाठीच्या परिषदेमध्ये बोलत होते.

क्षयरोगाला नष्ट करण्यासाठी भारतासह इतर देशांनी प्रमुख प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारतामध्ये क्षयरोगामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही सर्वाधिक आकडेवारी आहे. २०१६ मध्ये क्षयरोगाचे २६ लाख नवे रुग्ण आढळून आले. तसेच यामध्ये ४ लाख लोकांना क्षयरोग आणि एचआयव्हीची लागण झाली आहे. जर जागतिक स्तरावर क्षयरोग हद्दपार करायचा असेल तर सर्वप्रथम भारतातून तो नष्ट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.