टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस ही कंपनी वंशभेदी असून नोकरी देताना उमेदवार कुठल्या देशाचा आहे याचा विचार करतं आणि भारतीयांच्या बाजुनं पक्षपाती वागतं असा आरोप तीन अमेरिकींनी केला आहे. टीसीएसविरोधात कायदेशीर कारवाई या तिघांनी सुरू केली असून टीसीएसला हा धक्का असल्याचं मानण्यात येत आहे. टीसीएसवर दंडात्मक कारवाई करावी तसेच आम्हाला नुकसानभरपाई मिळावी अशी मागणीही या तिघांनी कोर्टात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डेरील स्टॅसी, डोनाल्ड ब्रॅडली व हेशम हाफेझ या तिघांनी न्यू जर्सीच्या जिल्हा न्यायालयात दाद मागितली असून अमेरिकी उमेदवार उपलब्ध असूनही टीसीएस भारतातून कर्मचारी आणते असा आरोप करण्यात आला आहे. टीसीएस भारतीय व दक्षिण आशियाई देशांमधील उमेदवारांनाच नोकरीत प्राधान्य देत वंशभेद करत असल्याचा गंभीर आरोप या तिघांनी केला आहे. या संदर्भात याआधीही भारतीय आयटी कंपन्यांविरोधात कोर्टकज्जे झाले असून ही आणखी एक ताजी घटना आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या उघडपणे आशियाई देशांमधून अमेरिकेत होत असलेल्या स्थलांतराच्या विरोधात आहेत व स्थानिकांना अग्रक्रमानं नोकऱ्या मिळाव्यात अशा मताचे आहेत, त्यामुळे टीसीएसवरील हा ताजा आरोप गंभीर ठरण्याची शक्यता आहे.

बाहरेच्या देशातील कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना अमेरिकेचा व्हिसा देण्यामागचं ओबामा सरकारच्या काळातलं धोरण ट्रम्प यांनी कडक केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर टीसीएसवर झालेल्या आरोपांकडे बघितलं जात आहे. अमेरिकेमधल्या रिकाम्या जागा भरताना व्हिसा असलेल्या दक्षिण आशियाई उमेदवारांचा प्राधान्यानं विचार व्हावा असं कंपनीचं धोरण असल्याचा आरोप या तिघांनी केल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सनं दिलं आहे. तक्रारदारांनी ज्युरींसमोर खटला चालवण्याची तसेच कंपनीला शिक्षा करण्याबरोबरच नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

कामावर घेताना टीसीएस भेदभाव करत असल्याचा आरोप याधीही करण्यात आला असून त्याप्रकरणी वकिलपत्र घेतलेल्या कोचन अँड लो या कंपनीनेच हा ही खटला गुदरला आहे. अर्थात, टीसीएसच्या प्रवक्त्यानं हे सगळे आरोप निराधार असल्याचा दावा केला असून आम्ही आमची बाजू कोर्टात यशस्वीपणे मांडू असा विश्वास व्यक्त केला आहे. असे खटले सुरू असताना टीसीएस व अन्य भारतीय कंपन्यांवर स्थानिक अमेरिकींनाच नोकरी देण्याचा दबाव निर्माण करणारी परिस्थिती निर्माण होत असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tcs faces lawsuit in us for discrimination in employment
First published on: 25-09-2018 at 14:53 IST