मध्य प्रदेशातील सतना येथे चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी शिक्षकाला न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. तीन महिन्यांपूर्वी ही बलात्काराची घटना घडली होती. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश दिनेश कुमार शर्मा यांनी २३ वर्षीय महेंद्र सिंह गोंड याला ही शिक्षा सुनावली आहे. १ जुलै रोजी मुलीवर बलात्कार झाला होता. अद्यापही मुलीची प्रकृती गंभीर असून दिल्लीमधील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. न्यायालयाने मुलीचं अपहरण केल्याप्रकरणी सात वर्षांच्या कठोर कारावासाचीही शिक्षा सुनावली आहे.

‘न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पीडित मुलगी आणि तिच्या आई-वडिलांची साक्ष नोंदवली. यानंतरच न्यायालयाने आरोपी गोंडला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली’, अशी माहिती वकिलाने दिली आहे. न्यायाधीशांनी बचाव पक्षाच्या २१ साक्षीदारांची उलट तपासणी घेतली.

आरोपी गोंड याची पीडित कुटुंबाशी ओळख होती. १ जुलैच्या रात्री मुलीच्या वडिलांना भेटण्यासाठी तो घरी गेला होता. यावेळी त्याने मुलगी वडिलांसोबत घराबाहेर खाटेवर झोपली असल्याचं पाहिलं होतं. मुलीच्या वडिलांची भेट घेतल्यानंतर तो घरी परतला होता. काही वेळानंतर तो पुन्हा परतला तेव्हा मुलगी एकटीच खाटेवर झोपली असल्याचं त्याने पाहिलं आणि संधी साधण्याचं ठरवलं.

आरोपी गोंड याने संधी साधत मुलीचं अपहरण केलं आणि बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर त्याने मुलीला झुडपात टाकून दिलं. मुलगी गायब झाल्याचं लक्षात आल्यानंतर तिच्या वडिलांनी शोधाशोध सुरु केली असता ती झुडपात बेशुद्द अवस्थेत पडली असल्याचं दिसलं.

पोलिसांनी कारवाई करत गोंडला अटक केली आणि चार्जशीटही दाखल केली होती. १२ वर्षाखालील मुलींवर बलात्कार प्रकरणी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याच्या कायद्याची अंमलबजावणी करणारं मध्य प्रदेश पहिलं राज्य आहे.