हाथरस सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशात आणखी एक हादरवून टाकणारे बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. पीडित तरुणीने कॉलेजच्या आवारात तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. यावेळी कॉलेजमध्ये नागरी सेवा २०२० ची परीक्षा सुरु होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कॉलेजची दहा ते बारा मुलं जबरदस्तीने मला कॉलेजच्या आवारात घेऊन गेली. त्यांच्यापैकी एकाने माझा विनयभंग केला. दुसऱ्या मुलांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला. माझ्याकडे असलेले दोन हजार रुपयेही काढून घेतले. मी ज्या मुलाला भेटायला गेली होती, त्याला सुद्धा या मुलांनी मारहाण केली असा आरोप पीडित तरुणीने तिच्या तक्रारीत केला आहे. या प्रकाराबद्दल कोणाकडे वाच्यात केली, तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी मला या मुलांनी दिली, असा आरोप पीडित तरुणीने तक्रारीत केला आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

या प्रकरणात दोन मुख्य आरोपींसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे, असे झासीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आणखी काही जणांची नावे समोर आली, तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल असे दिनेश कुमार यांनी सांगितले.

पीडित तरुणी परीक्षा केंद्रावर का गेली होती? त्याचा सुद्धा तपास होणार आहे. या परीक्षा केंद्रावर फक्त एक सुरक्षारक्षक होता. तो परीक्षा प्रक्रियेमध्ये व्यस्त होता. “काही पोलिसांना या महिलेचा रडण्याचा आवाज ऐकू आला. ते तिला सिपरी बाझार पोलीस ठाण्यात घेऊन गेले, तिथे तिने सर्व घडलेला प्रकार सांगितला” असे दिनेश कुमार यांनी सांगितले. सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यासह विविध कलमांखाली पोलिसांनी आरोपींविरोधात एफआयआर नोंदवला आहे. दरम्यान पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.