आयसिसच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणीने जम्मू-काश्मीरमध्ये घातपाताचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील गुप्तचर यंत्रणेला ही माहिती मिळाली असून दोन वर्षांपूर्वीच तिला महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतले होते. मात्र, समुपदेशनानंतर तिला सोडून देण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील येरवडा येथे राहणारी १६ वर्षांची मुलगी फेसबुकवर राजस्थानमधील एका तरुणाच्या संपर्कात आली. त्या तरुणाने तिचे ब्रेनवॉशिंग केले आणि तिला आयसिसमध्ये भरती होण्यासाठी तयार केले. मुलीच्या राहणीमानात आणि बोलण्यात अचानक फरक जाणवल्याने पालकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. अल्पवयीवन असल्याने पोलिसांनी जवळपास दोन महिने तिचे समुपदेशन करत तिला सोडून दिले.

समुपदेशनानंतर तिला सोडण्यात आले असले तरी पोलिसांचे एक पथक तिच्यावर नजर ठेवून होते. २०१७ मध्येही ही तरुणी घरातून निघून गेली. त्यावेळी दिल्लीतील विमानतळावरुन पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पोलिसांना आयसिसच्या संपर्कात असलेली एक तरुणी काश्मीरमध्ये आल्याची माहिती मिळाली. चौकशी केली असता ती तरुणी पुण्याची असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. जम्मू- काश्मीरमधील गुप्तचर यंत्रणांनी महाराष्ट्र एटीएसशी याबाबत संपर्क साधला आणि मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. त्यावेळी पुण्यातील ही तरुणीही काही दिवसांपूर्वीच घरातून निघून गेल्याचे समोर आल्याने या वृत्ताला दुजोरा मिळाला. जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करण्यात तिला यश आले असून प्रजासत्ताक दिनी तिथे घातपात घडवण्याचा तिचा कट असल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये सध्या हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

‘ती’ शिक्षणासाठी बाहेरगावी; पालकांचा दावा
‘ती सध्या शिक्षणासाठी बाहेरगावी असून ती कोठेही गेली नाही” असे तिच्या आईने सांगितले. पुणे पोलीस दलाचे सह आयुक्त रवींद्र कदम यांनी ही माहिती दिली. कदम म्हणाले, गुप्तचर विभागाकडून बुधवारीच या मुलीविषयी माहिती मिळाली. आम्ही तिच्या घरी जाऊन चौकशी केली. ती शिक्षणासाठी बाहेरगावी गेली आहे. ती सध्या कोठे आहे हे सांगू शकत नाही, असे तिच्या आईने सांगितले. त्यामुळे पुणे पोलिसांना तिचा ठाव ठिकाणा माहीत नाही, असे कदम यांनी सांगितले.