अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या मृत्युची चौकशी करण्याची मागणी दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे. सुशांतनं डिप्रेशनमुळे आत्महत्या केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं होतं. मात्र, आता त्यांच्या मृत्युची सीबीआय चौकशी करण्याची मागणी होत असून, राजदचे नेते तेजस्वी यादव यांनीच ही मागणी उपस्थित केली आहे. याप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महाराष्ट्र सरकारशी चर्चा करावी, असं आवाहन तेजस्वी यादव यांनी केलं आहे.

अभिनेते शेखर सुमन यांनी सुशांतच्या आत्महत्येचा मुद्दा लावून धरला आहे. शेखर सुमन यांच्यासह राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला. “सुशांतच्या मृत्युप्रकरणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महाराष्ट्र सरकारशी चर्चा करावी. सुशांतच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे करावी. राजगीर येथे तयार होत असलेल्या फिल्म सिटीला सुशांत सिंह राजपूतचं नाव देण्यात यावं. त्याचबरोबर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी व त्यांना आश्वासित करावं की, सुशांतच्या मृत्युप्रकरणी होणाऱ्या चौकशीसाठी संपूर्णपणे सहकार्य करण्यात येईल,” अशी मागणी तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे केली आहे.

अभिनेते शेखर सुमन यांनी सुशांतच्या आत्महत्येवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्ये प्रकरणी अभिनेते शेखर सुमन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. “ही आत्महत्या दिसत असली तरी कोणत्याही पुराव्याशिवाय असं म्हणता येणार नाही. जी वस्तुस्थिती समोर येत आहे. त्यावरून असं दिसतंय की सुशांतवर दबाव टाकण्यात आला होता. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी केली गेली पाहिजे. सिनेसृष्टीत घराणेशाही नाही, तर टोळीवाद आहे. इथे काही लोक गुणवत्तेला दाबून टाकतात,” असा आरोप शेखर सुमन यांनी केला आहे.